बुधवार, २९ नोव्हेंबर, २०२३

का आणि कसे लिहावे,हे सांगणारे पुस्तक "लिहते व्हा,"

आपल्याकडे सतराव्या शतकात  समर्थ रामदास स्वामी यांनी आपल्या उद्धबोधनात, दिसामंजी काहीतरी लिहावे, असे सांगितले आहे. त्यानंतरही अनेकांनी लिहण्याचे फायदे सांगितले आहेच. लिहण्यामुळे स्मरणशक्ती कसी विकसित होते, यावर देखील अनेकांनी लिहिले आहे.मात्र लिखाण करायचे ठरवल्यावर नक्की लिहायचे तरी काय ? आणि ते कसे सुरू करायचे,? या प्रश्नांबाबत मार्गदर्शन करणारे लेखन आपल्याकडे तसे कमीच.आणि या विषयावर जे लेखन उपलब्ध आहे ते देखील एखाद दुसऱ्या लेखाच्या स्वरुपात.मात्र फक्त याच विषयावर लिहलेले पुस्तक जर आपणास मिळाले तर ? सोन्याहून पिवळे असीच आपली स्थिती होणार हे नक्की. हा दुग्धशर्करा योग आपल्यासाठी जूळवून आणला आहे,नाशिकमधील व्यवसायाने बांधकाम व्यावसायिक , मात्र बाल साहित्याची मोठ्या प्रमाणात निर्मिती करणारे ज्येष्ठ साहित्यिक संतोष हुडलीकर यांनी.पुण्याचा पृथ्वीराज प्रकाशन या प्रकाशनातर्फे प्रकाशित  संतोष हुडलीकर यांच्या या पुस्तकात आपणास या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतातच तसेच लेखनाविषयी अन्य माहिती देखील मिळते‌.मी नुकतेच हे पुस्तक वाचले

सुमारे १७६ पानांच्या या पुस्तकात आपणास लेखन कोणत्या विषयावर करावे? ते का करावे? त्यांची सुरवात कमी करावी?लेखनास सुरवात वयाच्या कोणत्या टप्प्यात करावी?पुढील पिढीला आपला सांस्कृतिक वारस्याची माहिती देण्यासाठी लेखन कसे उपयोगी पडते."मरावे परी कीर्तीरूपे उरावे", ही म्हण प्रत्यक्ष आयुष्यात येण्यासाठी लेखन कसे उपयोगी पडते?, लेखन करताना काय काळजी घ्यावी? लेखन करणे आपल्या मनस्वास्थ्यासाठी का आवश्यक आहे? आपल्या लेखनात प्रगती कमी करावी? या सारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळण्यासह आयुष्यातरोजगाराचे साधन म्हणून आपण लेखनाकडे कसे बघू शकतो. जर आपण अर्थार्जनासाठी लेखनाकडे बघितल्यास काय काळजी घ्यावी  याची तोंडओळख देखील होते. लेखकाने ही सर्व माहिती सहज सोप्या चटकन समजणाऱ्या,मराठीत विविध प्रकरणातून दिली आहे.प्रत्येक प्रकरणाच्या आधी विषयाला अनुसरून विविध कोट देखील दिले आहेत.त्यामुळे विषय देखील चटकन आणि सहजतेने समजतो.लेखकाने लिहिलेल्या प्रत्येक मुद्यावर मोठ्या प्रमाणात लिहणे सहजशक्य असून देखील वाचकाला कंटाळवाणे वाटू
नये,यांचे भान राखत प्रत्येक विषय आटोपशीरपणे मांडला आहे.त्यामुळे पुस्तकांची रंजकता वाढली आहे.एकदा पुस्तक हातात घेतल्यावर पुस्तक हातातून खाली ठेवावे हे वाटतच नाही

लेखकाने पुस्तकाच्या अखेरच्या काही प्रकरणात सध्याच्या पिढीच्या लेखन करण्याचा ते टाळण्याचा प्रवृत्तीवर देखील भाष्य केले आहे.विषय समजावा लेखकाने विविध उदाहरणे देखील दिलेली आहेत. पुस्तकाचा फाँट देखील नेत्रसुखद आहे.त्याबद्दल प्रकाशकाचे देखील कौतूक करायला हवे. एखाद्या मुद्यावर किती लिहावे?किती लिहू नये हे देखील लेखकाने आपल्या लेखनातून मांडलंय कोण लिहू शकतो.कोण लिहू शकत नाही  यावर देखील लेखकाने एका प्रकरणात भाष्य  केले आहे. एका अर्थाने आपल्या लेखनाविषयीच्या सर्व संकल्पना किती खऱ्या आणिकिती  खोट्या आहेतहे समजण्यासह लेखनप्रक्रियेविषयी आपल्या जाणिवा वाढवण्याचे काम या पुस्तकामुळे नक्कीच होते. मग वाचणार ना हे पुस्तक.



शनिवार, २५ नोव्हेंबर, २०२३

"माळराने", या दुर्लक्षीत पर्यावरण घटकाला समर्पित दिवाळी अंक "भवताल"

       
आपल्या महाराष्ट्राला मोठा सांस्कृतिक परंपरांचा वारसा लाभलेला आहे.या परंपरा खुपचं विलोभनीय देखील आहेत. काही परंपरा तर फक्त आपल्या महाराष्ट्रातच नाही आढळतात. दिवाळीला खाद्य फराळाबरोबर बौद्धिकफराळ देणारे खास दिवाळी निमित्त देणारे दिवाळी अंक हे फक्त महाराष्ट्रातच आढळणाऱ्या  परंपरेचे एक उत्तम उदाहरण म्हणता येईल. सुरवातीला फक्त कथा कविता असे साहित्य असणारे दिवाळी अंक आता या  कथा कवितांखेरीज अनेक माहितीपुर्ण लेखांनी भरलेली असतात.ही माहिती विविध क्षेत्रांची असते.एका विशिष्ट क्षेत्रांची सखोलपणे माहिती देणारे दिवाळी अंक देखील अनेक आहेत.एका विशिष्ट विषयाला धरून प्रकाशित होणाऱ्या दिवाळी अंकात "भवताल "  हा आपल्या लेखांमुळे महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.त्यांचा 2023चा अंक मी नुकताच वाचला.
      गेल्या १०वर्षापासून पर्यावरणाशी सबंधित एक संकल्पना घेवून प्रकाशित होणाऱ्या या दिवाळी अंकाची या वर्षाची संकल्पना आहे, माळराने. पर्यावरणाच्या दृष्टीने दुर्लक्षीत अस्या माळरान या संकल्पनेवर आधारित हा अंक नेहमीप्रमाणे उत्तम वाचणीय झाला आहे.आपल्या पर्यावरणातील कोणतीही संकल्पना अगदी वरवर उजाड पडिक वाटणारी माळराने ही टाकाउ नाही,हे हा अंक आपणास पटवून देतो.तसेच आपण अज्ञानातून या पर्यावरण घटकास समजावून न घेता त्यावर वृक्षारोपण करत, माळरानावरील परिसंस्थेस कमी हानी करतो हे सुद्धा हा अंक आपणास दाखवून देतो. एरवी पडीक टाकाउ वाटणाऱ्या माळरानांवर विविध किटक, माळढोक सारखे विविध पक्षी, काळवीटासारखे तृणभक्षक पशू तसेच लांडगे सारखे मांसभक्षक पशू  तर विशिष्ट असे गवत आणि बांभूळ, बोर सारख्या वनस्पतींची रचना असलेली परिसंस्था असते आणि त्यावर आपली उपजीविका करणारे नंदगवळी, धनगर सारखे समाजघटक असतात.ही माहिती आपणास हा अंक देतो. माळराने ही परिसंस्था आहे,हे लक्षात घेवून तिचे जतन करण्यासाठी झटणाऱ्या विविध व्यक्तींची उपक्रमांची माहितीही या अंकात देण्यात आली आहे.
     १४४ पानांच्या अंकात जागोजागी परीसंस्थेची माहिती देणारी आकर्षक छायाचित्रे देण्यात आलेली आहे.त्यामुळे अंक अत्यंत आकर्षक होतो, आणि पुर्ण वाचल्याशिवाय आपणास सोडवत नाही.अंकाची विभागणी विविध प्रकरणात केलेली आहे.असी २०प्रकरणे या अंकात आहेत.ब्रिटीश राजवटीच्या आधी या माळराने  या परीसंस्थेची स्थिती काय होती.? ब्रिटीश राजवटीत ती कमी बदलली?स्वातंत्र मिळाल्यानंतर ती कितपत मुळ पदावर आली .? या परीसंस्थेवर आपली उपजीविका करणाऱ्या समाज घटकांचे आयुष्य या बदलांमुळे कसे बदलले ? त्यांची सद्यस्थिती काय आहे? सध्याची वाटचाल कायम राहिल्या भविष्यात माळराने ही परिसंस्था कोणती वळणे घेवू शकते.आदि अनेक प्रश्नांचीउत्तरे आपणास अंकात सापडतात.एकिकडे अन्य दिवाळी अंकात जाहिरातींचा महापूर दिसत असताना या अंकात मलपृष्ठावरील दोन जाहिराती वगळता अन्य अंकात जाहिराती दिसत नाही.हे देखील या अंकाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. आपली पर्यावरण विषयक जाणीव मोठ्या प्रमाणात हा अंक विस्तारतो मग वाचणार ना हा अंक 

सोमवार, २० नोव्हेंबर, २०२३

भारत चीन संघर्ष आणि जागतिक राजकारण हे सुलभतेने उलगडणारे पुस्तक " "शी जिनपिंग यांचा विस्तारवादी चीन आणि भारत चढती कमान वाढते तणाव"

चीन, ज्या 7देशांबरोबर भारताची जमिनीवर सीमा आहे त्या देशांमध्ये दुसरी मोठी भुसीमा असणारा देश म्हणजे चीन, (पहिली बांगलादेश {भारत बांगलादेश सीमा वेडीवाकडी असल्याने सहज लक्षात येत नाही.मात्र ती सीमा सरळ केल्यास भारताची सर्वाधिक सीमा बांगलादेशाबरोबर आहे}) नकाश्यात ज्या देशाची भारताबरोबरची सीमा बघताना अनावधानाने नेपाळ आणि भुतान बरोबरची त्या देशाची  सीमा देखील भारताची सीमा समजली जाउ शकते असा देश म्हणजे चीन, आपणावर 1962साली युद्ध लावणारा देश म्हणजे चीन, भारताबरोबर ब्रिक्स, एस.इ ओ तसेच  एशियन डेव्हलपमेंट  फंड सारख्या  जागतिक व्यासपीठांवर बरोबरचे स्थान मिळवणारा देश म्हणजे चीन. तर असा चीन भारताचा शत्रू आहे की स्पर्धक आणि भारत आणि चीन या दोन देशांतील राजकारणाचे जागतिक संदर्भ समजून घेयचे असल्यास ज्येष्ठ पत्रकार विजय नाईक यांनी लिहिलेले आणि रोहन प्रकाशनातर्फे प्रकाशित असे "शी जिनपिंग यांचा विस्तारवादी चीन आणि भारत चढती कमान वाढते तणाव" हे पुस्तक वाचायलाच हवे. जे मी नुकतेच सावाना घ्या मदतीने वाचले.
      22 प्रकरणातून त्यांनी हा विषय सविस्तरपणे मांडला आहे.सुमारे 214 पानांच्या या पुस्तकात सुरवातीच्या 10प्रकरणात  ,शी जिनपिंग यांची कार्यपद्धती ,1978पासून चीन कसा बदलत गेला , चीनमधील फुटीरतावाद ज्यात तिबेट आणि संकियांग वर (1962साली चीनने जिंकलेला पुर्व लडाखचा प्रदेश ज्या प्रांतात चीनने ठेवला आहे,असा एकेकाळचा मुस्लिमबांधव बहुसंख्य असलेला प्रांत)चा समावेश होतो त्यावर स्वतंत्र एकेका प्रकरणातून ,तसेच तैवान ,मकाऊ , हाँगकॉन यावर एकत्रीत एकाच प्रकरणात प्रकाश टाकत तसेच तिआनमेन हत्याकांडावर एका स्वतंत्र प्रकरणातून ,तर चीनचा विस्तारवाद, माओंचे स्वप्न, चीनच्या शासनापुढील आव्हाने तसेच जगात चीनची प्रतिमा चांगली व्हावी यासाठी केले जाणाऱ्या प्रयत्नांची एकेका प्रकरणात माहिती देत लेखक वर्तमान चीनचे तपशीलवार चित्र आपणासमोर मांडतो‌ 
  तर 11ते 17 या प्रकरणातून तसेच 22व्या प्रकरणातून  लेखक भारत आणि चीन संबंधांवर आपणास माहिती देतो.ज्यामध्ये भारत आणि चीन यातील इतिहासाचा भारताच्या स्वातंत्र्यापर्यतचा आढावा,1962नंतरचे दोन्ही देशांतील संबंध, मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात या संबंधात कसा बदल झालातसेच मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळात  त्यावेळच्या आपल्या  परराष्ट्रमंत्री निर्मला सीतारामन यांच्या वूहान भेटीमुळे काय झाले? चीनच्या भारतविरोधी धोरणावर आपणाकडे काय उत्तर आहेत? चीनचे महत्वकांक्षी  प्रकल्प असणारे बेल्ट रोड आणि सिल्क रूटचे भारतावर होणारे परिणाम यावर प्रत्येकी एका प्रकरणातून तर डोकलाम आणि गलवान क्षेत्रातील घूसखोरीवर दोन प्रकरणातून लेखक आपणास सविस्तरपणे माहिती देतो. 
   या खेरीज 18 ते 22,पर्यतच्या प्रकरणातून आपणास चीन अमेरिका व्यापार युद्ध , चीनच्या नागरिकांची चीनविषयक मते, करोना, आणि भविष्यात चीन काय करू शकतो या विषयी माहिती मिळते.
     इंग्रजीत या विषयावर अनेक पुस्तके आहेत.मात्र आपल्या मराठीतील हे सविस्तर माहिती देणारे मोजक्या पुस्तकांमधील एक आहे,असे मानल्यास चूकीचे ठरणार नाही.लेखक स्वतः 7वेळा चीनमध्ये रिपोर्टर म्हणून गेला आहे.लेखकास आंतरराष्ट्रीय राजकारणाची मोठी जाण आहे ‌मराठीतील अनेक नामांकित वृत्तपत्रांसाठी लेखकाने आंतरराष्ट्रीय घडामोडीवीषयक लेखन केले आहे. त्यांची या पुस्तकाखेरीज आंतरराष्ट्रीय संबंधांवर अन्य पुस्तके प्रकाशित झाली आहेत,हे बघता हे पुस्तक किती माहितीपूर्ण असेल याचा अंदाज बांधता येतो. आपल्या मराठीत आंतरराष्ट्रीय राजकारणावर मोजकीच पुस्तके आहेत.त्यातही बहुसंख्य पुस्तके मुळांच्या इंग्रजी पुस्तकाचे अनुवादच अधिक आहेत .त्या पार्श्वभूमीवर मुळातून मराठीत लिहिलेले हे पुस्तक वेगळे
ठरते.या पुस्तकातील प्रत्येक  प्रकरणासाठी कोणते संदर्भ वापरण्यात आले याची माहिती ते प्रकरण संपल्यावर देण्यात आलेली आहे. त्यामुळे जर एखाद्या विशिष्ट प्रकरणाचे संदर्भ हवे असतील तर चटकन सापडतात,हे या पुस्तकाचे विशेषच म्हणायला हवे. हे पुस्तक आपणास खुप माहिती ती देखील सहजसोप्या भाषेत देते.ज्यांना आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यास करायचा आहे ‌अस्या व्यक्तींनी त्यांचा अभ्यास या पुस्तकापासून सुरू केल्यास उत्तमच होईल.फक्त आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासाचं नव्हे तर सर्वसामान्य नागरीकास देखील जागरुक नागरिक होयचे असल्यास हे पुस्तक मदतच करेल.मग वाचणार ना हे पुस्तक .


शुक्रवार, १७ नोव्हेंबर, २०२३

गोष्ट्र एका ध्यासाची,,,प्रकाशवाटा

लोकबिरादरी ,हेमलकाशा  आज आपणास हे शद्ब खुपचं परिचयाचे झाले आहेत.अर्थात यामागे बाबा आमटे आणि त्याचे पुत्र प्रकाश आमटे आणि प्रकाश आमटे यांच्या सुविद्य पत्नी मंदाकिनी आमटे आणि त्यांना मदत करणारे असंख्य कार्यकर्त्यांचे परिश्रम खुप मोलाचे आहेत आपण कल्पना देखील करु शकणार नाही अस्या हाल अपेष्टा आणि संकटांना सामोरे जात ,त्यांनी हे विश्व उभारले आहे. त्यांनी कोणत्या कष्टांना सामोरे जात हे यश मिळवले आहे हे आपणास माहिती करुन घेयचे असल्यास आपणास डॉ प्रकाश आमटे लिखित आणि समकालीन प्रकाशनातर्फे प्रकाशित "प्रकाशवाटा " हा एक उत्तम पर्याय आहे.नाशिकमधील सर्वात जूने वाचनालय असणाऱ्या सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्यामुळे मी नुकतेच सदर पुस्तक वाचले.
       सुमारे दिडशे पानांच्या या पुस्तकात विविध अस्या १४प्रकारणातून त्यांनी हे विश्व कसे उभारले गेले ? याबाबत आपणास माहिती मिळते‌.हा प्रकल्प ज्यांच्यासाठी राबवायचा आहे.त्या आदिवासी (वनवासी)समाजबांधवांचा त्यांच्याकडे बघण्याचा सुरवातीचा दृष्टीकोन कसा होता ?तो बदलत बदलत जात असा अनुकूल झाला ? तो अनुकुल होण्यासाठी प्रकाश आमटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काय कष्ट केले? भाषेसह , आदिवासी (वनवासी)यांचे अज्ञान,द्रारीद्य या अडचणींवर त्यांनी कश्या प्रकारे मात केली? प्रकल्पाची उभारणी करताना त्यांना कोणत्या शासकीय आणि नैसर्गिक अडचणींचा सामना करावा लागला? राहण्यास प्रतीकुल असणाऱ्या या प्रदेशास त्यांनी राहण्यास अनुकुल कसे केले?त्यांना काम सुरु करताना प्रदेशात काहीच दळणवळणाच्या सोयी नसल्याने काय काय अडचणींना सामोरे जावे लागले?अस्या असंख्य प्रश्नांची उत्तरे आपणास या पुस्तकाच्या वाचनामुळे मिळतात.
हेमलकाशा येथे प्रकल्प उभारणीत डॉ.प्रकाश आमटे यांचे अत्यंत मोलाचे योगदान आहे,हे नाकारु शकणे अशक्यआहे.पुस्तक त्यांनीच लिहिले आहे.मात्र पुस्तकात कुठेही मी पणाचा लवलेशही दिसत नाही.मी केलं असा उल्लेख न करता सातत्याने हेमलकाशावर कार्यरत कार्यकर्त्यांनी केले असाच उल्लेख संपूर्ण पुस्तकात केलेला आढळतो‌ स्वतः केलेल्या कामाचे श्रेय दुसऱ्यांना देवुन स्वतः नामानिराळे राहण्याचा मोठेपणा आपणास पुस्तकामध्ये पदोपदी अनुभवयास येतो. 
पुस्तकात सुरवातीला सुमारे पहिली ५०पाने हेमलकाशा येथील प्रकल्पात वैद्यकीय सेवा कस्या प्रकारे सुरु झाल्या,याबाबत सांगण्यात आले आहे सुरवातीची सात प्रकरणे यावर भाष्य करतात‌.त्यानंतर तेथील आदिवासी (वनवासी)समाजबांधवांसाठी शाळा सुरु केल्यावर आलेल्या अनुभवांविषयी सांगण्यात आआहे.पुस्तकाचा शेवटच्या एक तृतीयांश भागात माडिया आदिवासींची (वनवासींची) सर्वांगीण प्रगती व्हावी यासाठी कोणकोणते प्रकल्प राबवण्यात आले.ते राबवताना काय काय अनुभव आले या विषयी सांगण्यात आले आहे. ज्यामध्ये हेमलकाशा परिसरात शेतीची सुरुवात करणे, त्या प्रदेशात लोक अदालत भरवण्यास सुरवात करणे.त्या  प्रदेशातील नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देणे, आदि गोष्टी प्रमुख आहेत. अनेकांच्या इच्छूकतेचा आणि कौतूकाचा विषय असलेल्या प्राणी जीवनाविषयी ११व्या प्रकरणात सांगितलेले आहे.त्यानंतर १२व्या प्रकरणात पुढची पिढी या शीर्षकाखाली वैयक्तिक  आयुष्याविषयी सांगितले आहे. तर पुढच्या

दोन प्रकरणात यास समाजमान्यता कशी मिळाली तसेच हा डोलारा सांभळताना येणाऱ्या अडचणींविषयी सांगितले आहे तर शेवटच्या प्रकरणात समारोप करण्यात आला आहे.
या प्रकल्पात तूम्हाला काम मिळालं तर सोन्याहून पिवळं , मात्र ते नाही मिळालं तरी हा प्रकल्प नक्की काय आहे?कोणत्या कष्टातून हा प्रकल्प सुरु झाला, हे घर बसल्या समजण्यासाठी किमान एकदा हे पुस्तक वाचायलाच हवं!मग कधी करताय सुरवात हे पुस्तक वाचायला?

गुरुवार, १६ नोव्हेंबर, २०२३

राजकारणाचे अथपासून इथीपर्यत उलगडणारी कांदबरी सिंहासन

    आपल्या मराठीला अनेक चांगल्या कादंबरीची मोठी दिर्घ परंपरा लाभलेली आहे. या या कादंबऱ्यांची पार्श्वभूमी अनेकदा ऐतिहासिक तसेच सद्य स्थितीवर आधारीत आहे.
कादंबरीवर अनेक  उत्तमोत्तम चित्रपट देखील निघाले आहेत. अस्याच कांदबरी आधारीत एक उत्कृष्ट चित्रपट जो सद्य स्थितीवर भाष्य करतो असा चित्रपट म्हणजे नुकताच प्रदर्शित होवून ४४वर्षे पुर्ण झाली तरी आज देखील ताजातवाना वाटतो असा मुंबई दिनांक आणि सिंहासन या दोन कांदबरीवर आधारीत मल्टीस्टार असलेला चित्रपट सिंहासन .
तर मित्रांनो हा उत्कृष्ट चित्रपट ज्या दोन कांदबरीवर आधारीत आहे.त्यातील एक म्हणजे "सिंहासन" मी नुकतीच वाचली.ज्यामुळे सिंहासन  या अजरामर ठरेल अस्या या चित्रपटाची कथा तितकीच सशक्त आहे, हे मला समजले. ज्या प्रमाणे चित्रपट सुरवातीपासून आपली पकड घेतो त्या प्रमाणेच कांदबरी देखील आपल्या मनाचा लगेच ठाव घेते.कांदबरीत पार्श्वभूमीवर फारसी पाने ज्येष्ठ पत्रकार अरुण साधू यांनी खर्ची पाडलेली नाही. सुरवातीच्या जेमतेम हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या पानांमध्येच त्यांनी कांदबरीसाठी पार्श्वभूमी उभारली आहे.
      चित्रपटाप्रमाणेच कांदबरी सुरवात देखील अनेक नाट्यमय प्रसंगातून होते. कांदबरी सुद्धा अनेक नायकाभोवती फिरते,त्यातील एक नायक म्हणजे पत्रकार दिगू .त्याला एका आमदाराचा फोन येतो ज्यात तो अर्थमंत्री विश्वासराव  दाभाडे मुख्यमंत्र्यांविरोधात उठाव करून स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी राजीनामा देणार असल्याचे सांगतो दिगू  माहितगारांकडून त्याबाबत खातरजमा करण्यासाठी विविध फोन करतो दरम्यान ही बातमी अन्य आमदारांना समजते आणि कांदबरीतील नाट्याला सुरवात होते.जे पुढच्या सुमारे ३१५ पानांवर उत्तरोत्तर रंगत जाते‌.चित्रपटात शेवटी दाखवल्याप्रमाणे  कांदबरीत मुख्यमंत्री अर्थमंत्र्यावर त्याचाच डाव उलथून लावतात. मात्र चित्रपटात दाखवल्याप्रमाणे दिगू या पत्रकाराला कांदबरीत वेड लागतं नाही तर तो वार्तांकन करण्याचे सोडून देवून उपसंपदकाची नोकरी स्वीकारण्याचे मनोमन ठरवत आपल्या प्रेयसीसोबत क्रीडा करायला लागतो‌ चित्रपटात  मुख्य पात्रांपैकी एक असणारे डिकास्टा हे पात्र  सिंहासन या कांदबरीत फार ठळक केलेले नाही,त्यांचा ओझरता उल्लेख तीन ते चार पानात येतो.
मला मुळ चित्रपट माहिती असल्याने मी कांदबरी वाचताना सातत्याने सदर प्रसंग चित्रपटात कुठे आहे याचा शोध मनात घेत होतो‌.या शोधात या कथेवरून चित्रपटाची पटकथा लिहिताना त्यात अनेक ठिकाणी बदल केल्याचे मला जाणवले अर्थात ते स्वातंत्र्य पटकथाकारास आहेच‌.मी या सुप्रसिद्ध पुस्तकांची अकरावी आवृत्ती वाचली.या आवृत्तीत पुस्तकाच्या सुरुवातीलाच अन्य मालिकांप्रमाणे कथानक काल्पनिक असून यात सत्यस्थिती आढळल्यास तो योगायोग समजावा असे लिहिलेले आहे.मात्र कांदबरी वाचताना सातत्याने हे सत्य घटनेचेच नाट्यरुपांतर तर नाही असी शंका आपणास यावी इतक्या मोठ्या प्रमाणात सत्यता या कांदबरीत पदोपदी जाणवते. 
या कादंबरीवर आधारित चित्रपट मराठीतीलच नव्हे तर भारतातील उत्कृष्ट राजकीय चित्रपट असला आणि तो समजायला सोपा असला तरी चित्रपट मुळातून समजायला ही कांदबरी वाचायलाच हवी.
 

पश्चिमी आशिया,इस्लामी जगत यांची मुळातून जडणघडण उगडणारे पुस्तक 'अधर्म युद्ध'

जगाच्या नकाश्यात आपल्या भारतापासून डावीकडे नजर फिरवायला सुरवात केल्यानंतर इराण देशानंतर समुद्र काहीसा आत गेलेला दिसतो.जगातील सुम...