लेखाचे विषय

बुधवार, १४ ऑक्टोबर, २०२६

स्वामी विवेकानंद यांच्या मानस कन्येचा जीवन प्रवास उलगडवणारे पुस्तक कर्मयोगीनी भगिनी निवेदीता

जन्माने आयरिस धर्माने सुरुवातीला ख्रिस्ती मात्र स्वामी विवेकानंद यांच्या सानिध्यात आल्याने आपल्या इतकीच भारतीय झालेली स्वामी विवेकानंद यांची मानस कन्या म्हणून आपण भगिनी निवेदिता यांना ओळखतो. मात्र भगिनी निवेदिता यांची इतकीच ओळख नाही, भगिनी निवेदिता यांना आपण वेदकाळातील गार्गी मैत्रीयी यांची परंपरा पुढे अवाह्यात पुढे नेणारी विदूषी जिने आपल्या लेखनाद्वारे, आणि व्याख्यानाद्धारे भारताच्या प्राचीन वारस्याची जगाला ओळख करून दिली, म्हणूनही ओळखू शकतो. भगिनी निवेदीता यांच्या व्यक्तीमत्त्वातील विविध गुणांची ओळख होते ती कर्मयोगीनी भगिनी निवेदिता या विवेकानंद केंद्र कन्याकुमारी मराठी प्रकाशन विभागातर्फे प्रकाशित 80 पानी छोटेखानी पुस्तकातून.

विवेकानंद  केंद्राच्या मालेगाव  शाखेतील धडाडीचे कार्यकर्ते डॉ. सुरेश शास्त्री यांनी भगिनी निवेदिता यांच्या स्मृतीस शताब्दी वर्षाचे औचित्य साधत लिहिलेल्या या पुस्तकाचे आपण दोन भागात सहजतेने विभाजन करू शकतो. पहिल्या भागात निवेदिता यांच्या जन्म, कौटुंबिक स्थिती, त्यांच्या आईची त्यांच्या जन्माच्या वेळची इच्छा, त्यांचे बालपण आणि त्यांचा असणारा धार्मिकतेचा कल,  त्यांचे स्वामी विवेकानंद यांचा ओळख होण्यापर्यंतचे जीवन, स्वामी विवेकानंद बरोबर केलेले कार्य तसेच स्वामी विवेकानंद यांच्या निर्वाणानंतर स्वामी विवेकानंदांचे त्यांनी पुढे नेलेले कार्य याविषयी अत्यंत सहज सोप्या चटकन समजणाऱ्या भाषेत तीन प्रकरणाद्वारे सांगण्यात आलेले आहे. अष्टपैलू निवेदिता असे शीर्षक असलेल्या दुसऱ्या भागात आठ परिशिष्ठे आहेत.ज्यात भगिनी निवेदिता यांची स्वामी विवेकानंद यांची शिष्या म्हणून असणारी ओळख, तसेच त्यांनी शिक्षिका म्हणून केलेले कार्य, त्यांनी पंडिता म्हणून केलेले कार्य, समाजप्रबोधन करण्यासाठी केलेले कार्य, राष्ट्रभक्त म्हणून केलेले कार्य, स्वामी विवेकानंद यांचै विचार पुढे न्यायचे म्हणून जीवनव्रती म्हणून केलेले कार्य लोकांची सेवा केली म्हणून लोकमाता असणारी त्यांची ओळख तसेच हिंदू तत्त्वज्ञानात मोठी गोष्ट समजण्यात  येणारी कर्मयोगाची जपणूक करणारी व्यक्ती म्हणून कर्मयोगिनी विविध पैलूंद्वारे ओळख होते.

नोव्हेंबर 1895 मध्ये स्वामी विवेकानंद पहिल्यांदा भेटल्या नंतर मार्गारिट नोबेल आणि भारताचा पवित्र भूमीत 1910 साली देह ठेवणाऱ्या भगिनी निवेदिता हा केवळ एका व्यक्तीच्या अध्यात्मिक प्रवास नसून हा संपूर्ण कालखंड आपण साऱ्या भारतीयांसाठी अद्भुत तेजोमय आणि प्रेरणादायी प्रवास असाच होता. हा प्रवास अत्यंत सहज सोप्या भाषेत या पुस्तकात मांडलेला आहे. पुस्तक वाचल्याने आपणास भगिनी निवेदिता यांनी भारतात केलेले लोक विलक्षण कार्य त्यांच्या असीम त्याग संपूर्ण समर्पणता आपल्या देशवासियां प्रति असलेली अपार करुणा आणि त्यातून उभे राहिलेले लोकसेवेचे उत्तम कार्य स्पष्टपणे समजते. आणि स्वामी विवेकानंदांचे कार्य आपल्यास किती मोठे होते याचा साक्षात्कार देखील होतो, आणि त्यासाठी किमान एकदातरी हे पुस्तक वाचायलाच हवे.

प्रत्येक ध्येयवादी व्यक्तीने वाचायलाच हवा असा ग्रंथ पुस्तक "सेवा समर्पण


मनुष्याने ध्येयवादी का असावे, हे सांगणारे एक संस्कृत सुभाषित प्रसिद्ध आहे.

प्रारभ्यते न खलु विघ्नभयेन नीचैः,
प्रारभ्य विघ्नविहता विरमन्ति मध्याः।
विघ्नैः पुनः पुनरपि प्रतिहन्यमानाः,
प्रारब्धमुत्तमजना न परित्यजन्ति॥

मराठीमध्ये याचे भाषांतर करायचे झाल्यास ते पुढीलप्रमाणे होते.

मनुष्याच्या तीन श्रेणी असतात.. कनिष्ठ (नीच) लोक : जे संकटांच्या किंवा अडचणींच्या भीतीने कोणत्याही चांगल्या किंवा ध्येयाच्या कामाची सुरुवातच करत नाहीत. मध्यम लोक : जे कामाची सुरुवात तर करतात, पण वाटेत एखादे संकट किंवा अडचण आली की काम मध्येच सोडून देतात.उत्तम (ध्येयवादी) लोक : जे एकदा ध्येय निश्चित करून काम सुरू करतात, मग वाटेत कितीही संकटे आली आणि कितीही वेळा अपयश आले, तरीही ते आपले ध्येय साध्य केल्याशिवाय थांबत नाहीत आणि काम कधीही सोडून देत नाहीत.

याचा भावार्थ विचारात घेतल्यास आपण पुढील गोष्टी लक्षात घेऊ शकतो.

 ध्येयाशिवाय माणसाचे जीवन दिशाहीन होते. ध्येयवादी व्यक्तीला कठीण काळातही पुढे जाण्याची प्रेरणा मिळते.उत्तम आणि ध्येयवादी माणसे संकटांना घाबरत नाहीत. ती प्रत्येक अडचणीला एक आव्हान मानून त्यावर मात करतात. व्यक्ती आपल्या ध्येयावर ठाम राहते, तीच समाजात आदरणीय ठरते आणि आपले जीवन यशस्वी करते.त्यामुळेच, माणसाने नेहमी ‘उत्तम’ श्रेणीत जाण्यासाठी ध्येयवादी असले पाहिजे.

वरील संस्कृत सुभाषित मधून आपणास ध्येयवादी असणे का आवश्यक आहे हे समजत असले तरी याचा मार्ग आपणास  उलगडतो तो विवेकानंद केंद्र कन्याकुमारीच्या मराठी प्रकाशन विभागामार्फत प्रकाशित 'सेवा समपर्ण' या  ग्रंथाच्या च्या माध्यमातून. विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचे  संस्थापक एकनाथजी रानडे यांनी केंद्राच्या जीवनव्रती कार्यकर्त्यांना उद्देशून केलेल्या भाषणाचे मराठी भाषांतरं असलेले हा ग्रंथ  फक्त केंद्र कार्यकर्त्यांनाच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांना  देखील अनेक विषयावर सहजतेने मार्गदर्शक  करतो असे म्हटल्यास आवाज

ठरणार नाही . 

व्यक्तीने आयुष्यात ध्येय निश्चित का करावे ? आपल्या प्राचीन भारतीय सनातन संस्कृतीचे माहात्म्य नक्की कश्यात आहे ? विवेकानंद केंद स्थापन करण्यामागची एकनाथजी त्यांची प्रेरणा, त्यासाठी त्यांच्याकडे असणारी सुसूत्रबद्ध  योजना, विवेकानंद केंद्राची कार्यपद्धती, विवेकानंद केंद्राचे ध्येय , अन्य समविचारी संघटनेबाबत केंद्राची भूमिका यासह कोणत्याही प्रकारची सामाजिक संघटना यशस्वी पद्धतीने कार्यन्वित होण्यासाठी तिचे व्यवस्थापन कसे असावे ? कार्यकर्त्याचे आचरण कसे असावे ? संघटनाचे कामकाज करताना काय काय चुका वळू शकतात ? यांसारख्या असंख्य प्रश्नाची उत्तर म्हणजे सदर ४०० पानी ग्रंथ 

'स्पिरिच्युअलॉइझिंग लाईफ ' या  शीर्षकाखाली इंग्रजी भाषेत पाहिल्यान्दा १९८९ साली सुमारे १२५ पानांच्या स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आलेल्या  पुस्तकाचे पुढे जस जसे मा .एकनाथजी यांची भाषणे लिखित स्वरूपात संशोधित स्वरूपात जतन  करण्यात आले त्या त्या  प्रकारे  विवेकानंद केंद्राच्या विद्यमान अध्यक्षा निवेदिता भिडे यांच्याकार्यकुशल नेतृत्वात   अधिक उत्तम संपादित करून  प्रसिद्ध करण्यात आलेल्या ग्रँथाचा  सुनीता करकरे यांनी केलेला अनुवाद म्हणजे सदर ग्रंथ होय . 

या ग्रथांत एकूण ४ प्रकरणे आहेत जी अनुक्रमे आध्यत्मिक जीवनासाठी तयारी, जीवनाचा प्रवास : स्वार्थाकडून निःस्वार्थाकडे, अध्यामप्रेरित सेवा संघटन, संघटकांची साधना या ४ भागात विभागली आहेत .आध्यत्मिक जीवनासाठी तयारी यामध्ये कोणत्याही व्यक्तीने कोणतीही सेवा करताना कोणता दृष्टिकोन अंगिकारायला हवा. स्वयंसेवक होण्यासाठी कोणत्या प्रकारचे व्यक्तिमत्व असावे त्यास ध्यात्मक बैठक कशी असावी  याबाबत २ प्रकरणातून  सांगण्यात आले आहे . दुसऱ्या भागाचे  शीर्षक जीवनाचा प्रवास : स्वार्थाकडून निःस्वार्थाकडे, असे आहे यात ९ प्रकरणातून मनुष्याला ध्येय का असावे ?, आपण निश्तित केलेले ध्येय सध्या करण्यासाठी आपले आचरण कसे असावे ? ध्येय आयुष्याच्या कोणत्या टप्प्यावर निश्चित करावेत ?मनुष्याचे आचरण कितपत

स्वार्थी असावे निस्वार्थी जिणं म्हणजे काय या विषयी माहिती देते .या पुस्तकाची रचना जो हेतू ठरवून कऱण्यात आली आहे तो विवेकानंद केंद्राची मध्यवर्ती संकल्पना आपणास अध्यामप्रेरित सेवा संघटन,या तिसऱ्या भागात उलगडते. या भागात ८ प्रकारांद्वारे आपणास विवेकानंद केंद्र हे संघटन कोणत्या प्रकारचे संघटन आहे  ? हि एक समाजोपयोगी चळवळ का म्हणता येते ? विवेकानंद केंद्र या संघटनेतील कार्यकर्त्याचे वैशिष्ठये काय आहेत ? समविचारी असलेल्या रामकृष्ण मठापेक्षा विवेकानंद केंद्र वेगळे का आहे. ? विवेकानंद केंद्र सेवाभावी संघटन त्यातही अधिक  बिनचूक म्हणायचे झाल्यास अध्यामप्रेरित संघटन का आहे ? विवेकानंद केंद्र्याचे साध्य काय  आहे?  या शिवाय मा एकनाथजी रानडे त्यांनी जीवनव्रतींशी संवाद साधताना जीवनव्रतींनि विचारलेल्या प्रश्नाविषयी माहिती मिळते. तर शेवटच्या ४ भागात १० प्रकरणाद्वारे सर्वसाधारण समाजसेवी संस्थांचे कार्य संचलित करताना काय काळजी घ्यावी याची माहिती देण्यात आलेली आहे तर याच भागाच्या शेवटच्या ११ प्रकरणात जीवनव्रतींशी सर्वसाधर्न  संवाद साधला आहे 

विवेकानंद केंदाची सविस्तर मुद्देसुद्द तरीही कमीत कमीशब्दात  महती होण्यासह व्यक्तीच्या आयुष्यात  सध्या अत्यंत महत्वाचे ठरलेल्य्या गोल सेटिंग सह कोणत्याही समाजसेवी संस्थेचे कार्य कोणत्या पद्धतीने चालायला आव यांची माहिती करून घेण्यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवे 





  


व




सोमवार, २८ सप्टेंबर, २०२६

स्वामी विवेकानंद यांचे कमी शब्दात उलगडणारे चरित्र मंत्रद्रष्टा स्वामी विवेकानंद

काही व्यक्ती मोठ्या विलक्षण असतात अशा व्यक्तींची वेगवेगळ्या व्यक्तींनी लिहिलेली चरित्र वाचली वाचली तरीसद्धा आपण त्या व्यक्तीला पूर्णपणे ओळखले आहे असे ठामपणे सांगता येत नाही. प्रत्येक चरित्रातून आपल्याला त्या व्यक्तीचा एक वेगवेगळा पैलू समजतो. आणि आधीचा चरित्राच्या वाचनातून अरे आपणास हा पैलू का नाही समजला असा विचार चमकून जातो. या प्रकरच्या बहु आयामी व्यक्तीमत्त्वांमध्ये स्वामी विवेकानंद यांच्या समावेश होतो.
स्वामी विवेकानंद हे केवळ एक संन्यासी किंवा आध्यात्मिक पुरुष नव्हते, तर भारताच्या पुनर्जागरणाचे मंत्रद्रष्टे होते. भारतीय अध्यात्माची वैश्विक ओळख निर्माण करतानाच त्यांनी भारतीय समाजाला आत्मविश्वास, आत्मभान आणि राष्ट्रभक्तीचा संदेश दिला.
अस्या भारत मातेचे थोर सुपुत्र असणाऱ्या स्वामी विवेकानंद यांचे विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग आणि हरिभक्त परायणकार अनंतबुवा मेहेंदळे  यांनी लिहिलेले मंत्र दृष्टा स्वामी विवेकानंद हे लघु चरित्र मी नुकतेच वाचले तसं बघायला गेलं तर मी याआधी रामकृष्ण मठातर्फे प्रकाशित स्वामी विवेकानंद यांचे सखोल सविस्तर चरित्र वाचलेले आहे मूळचे बंगाली भाषेत प्रसिद्ध झालेले मात्र  राजहंस प्रकाशातर्फे अज्ञात  विवेकानंद या नावाने मराठीत अनुवादित करण्यात आलेले स्वामी विवेकानंद यांचे वैयक्तिक आयुष्यभर भाष्य करणारे चरित्र सुद्धा मीवाचले आहे. त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंद यांची छोटीशी ओळख करून देणाऱ्या विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभागातर्फे प्रकाशित गोष्टी सुद्धा वाचल्या आहेत. मी आत्ता वाचलेले स्वामी विवेकानंद चरित्र या आधीच्या चरीत्रांपेक्षाखूप मोठ्या अर्थाने वेगळे आहे. 
स्वामी विवेकानंद यांच्या दीडशे व्या जयंतीचे औचित्य साधत विवेकानंद केंद्र कन्याकुमारी मराठी प्रकाशन विभागातर्फे स्वामी विवेकानंद विषयीची अनेक पुस्तके मराठीत प्रकाशित करण्यात आली त्याच मालिकेत हे ८८ पानांचे चरित्र प्रकाशित करण्यात आले. आपण एखादे कीर्तन तर वाचत नाही ना असे वाटावे अशा पद्धतीच्या लेखन शैलीत सदर पुस्तक लिहिलेले  आहे अर्थात कीर्तनात असतात तसे तीन भाग या पुस्तकात नाहीये. कीर्तनात जसा एखादा अभंग उघडला जातो त्या पद्धतीने स्वामी विवेकानंद यांचे चरित्र हे काव्यात्मक स्वरूपात पुढे मांडत पुढे त्या काव्याचे गद्य स्पष्टीकरण असे पुस्तकाचे सर्वसाधारण स्वरूप आहे
पुस्तक आठ प्रकरणात विभागले आहे पहिले प्रकरण स्वामी विवेकानंद यांच्या आजोबांविषयी आजोबांनी घेतलेला
संन्यास त्यानंतर वडील विश्वनाथ यांच्या आयुष्यात झालेल्या बदल यावर भाष्य करते दुसरे प्रकरण स्वामी विवेकानंद यांचे वडील विश्वनाथ यांचे आयुष्य आपल्यासमोर आणते तर तिसऱ्या प्रकरणापासून स्वामी विवेकानंद यांच्या चरित्राच्या खऱ्या अर्थाने प्रारंभ होतो. तिसऱ्या प्रकरणात नरेंद्रनाथ दत्त याची रामकृष्ण परमहंस यांच्या भेट होण्यापर्यंतचे आयुष्य सांगते. चौथ्या प्रकरणात 
नरेंद्रनाथ दत्तचा प्रवास स्वामी विवेकानंद या नावाने कसा होतो याविषयी तसेच रामकृष्ण  आणि विवेकानंद यांच्या सबंधाविषयी कथन करते पाचवे प्रकरण स्वामी विवेकानंद यांच्या  सर्वधर्म परिषदेतील सहभाग सांगते सहाव्या प्रकरण त्यानंतर स्वामी विवेकानंद यांनी केलेले कार्य उलगडते सातवे आणि आठवे प्रकरण अनुक्रमे स्वामी विवेकानंद यांच्यामुळे भारताची प्रतिमा कशी जगात उजळली याविषयी तसेच आजचा काळा सुद्धा स्वामी विवेकानंद यांच्या विचार का महत्त्वाचा आहे याविषयी सांगते ज्यांना कमी वेळेत अधिक प्रमाणात आणि सविस्तर सखोल प्रमाणे स्वामी विवेकानंद समजून घ्यायचे आहेत त्यांनी हे पुस्तक वाचायलाच हवे.


 
 


गुरुवार, १७ सप्टेंबर, २०२६

राष्ट्रीय प्रतीकांच्या उभारणीची प्रेरणादायी गोष्ट- कथा विवेकानंद शिला स्मारकाची


कन्याकुमारी, अंदमान निकोबार बेटे आणि लक्षद्वीप बेटे वगळता भारताच्या मुख्य भूमीचे दक्षिणेकडील टोक असलेले एक असे शहर आहे, जिथे हिंदी महासागर, अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर एकत्र येतात. जगात तीन समुद्र एकत्र येण्याची तीन ठिकाणे आहेत. एक म्हणजे कन्याकुमारी, तर अन्य दोन ठिकाणे अंटार्तिका खंडाजवळ आहेत. मात्र जगभरात ज्या ठिकाणाजवळ वस्ती आहे, असे ठिकाण एकच कन्याकुमारी. (२०२१ मार्चमध्ये अंटार्तिका खंडाजवळच्या समुद्राला दक्षिण महासागर म्हणून जागतिक महासागर संघटनेने मान्यता दिल्याने प्रशांत, हिंदी आणि दक्षिण या महासागर यांच्या एकत्र येण्याच्या ठिकाणी तसेच अटलांटिक, हिंदी आणि दक्षिण महासागर एकत्र येण्याची ठिकाणे २०२१ नंतर नव्याने उदयास आली आहेत.)

या कन्याकुमारीचे मुख्य आकर्षण म्हणजे स्वामी विवेकानंद यांनी ज्या खडकावर बसून सलग तीन दिवस रात्र बसून ध्यान केले, त्या ठिकाणी उभारण्यात आलेले विवेकानंद शिला स्मारक. आपण पर्यटक म्हणून या ठिकाणी सहजतेने भेट देतो; मात्र त्याची उभारणी तितकी सोपी नव्हती. त्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. स्थानिक ख्रिस्ती धर्मीय लोक, तत्कालीन तामिळनाडू येथील राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्याकडून विविध परवानग्या मिळवत तसेच नागरिकांकडून निधी संकलन करत माननीय एकनाथजी रानाडे यांनी या राष्ट्रीय स्मारकाची उभारणी केली. हा संपूर्ण संघर्ष विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभागातर्फे प्रकाशित ‘कथा विवेकानंद शिला स्मारकाची’ या पुस्तकातून वाचावयास मिळतो.

‘कथा विवेकानंद शिला स्मारकाची’ हे पुस्तक रूढ अर्थाने एका वास्तूच्या निर्मितीचा इतिहास सांगणारे पुस्तक नाहीये. मोठे ध्येय समोर ठेवून त्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे, विविध व्यक्तींना जोडणे, अडचणींवर मात करणे आणि समाजाच्या सामूहिक शक्तीला राष्ट्रकार्यात परिवर्तित करणे, ही कार्ये कोणत्या पद्धतीने आकारास येतात याचे संपूर्ण चित्र आपल्या डोळ्यांसमोर येण्याचे काम पुस्तकातून घडते.

एखाद्या भव्य स्मारकाकडे पाहताना त्याची वास्तू, भव्यता आणि कलात्मकता सहजपणे नजरेत भरते; मात्र त्या वास्तूमागे असलेला संघर्ष, त्यासाठी झटलेली माणसे, त्यांचा संकल्प आणि समाजाचा सहभाग यांची कथाअनेकदा दुर्लक्षित राहते. कन्याकुमारीच्या समुद्रातील शिलेवर उभे असलेले विवेकानंद शिला स्मारक हे एकाराष्ट्रीय संकल्पाचे आणि सामूहिक प्रयत्नांचे प्रतीक आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातील सामान्य नागरिकांपासून विविध क्षेत्रांतील मान्यवरांपर्यंत अनेकांनी या राष्ट्रीय कार्यात आपला सहभाग नोंदवला. प्रत्येक नागरिकाचा वाटा महत्त्वाचा आहे, ही भावना या अभियानातून रुजली. हा संपूर्ण प्रवास सहजसोप्या मात्र जोशपूर्ण शब्दांत या पुस्तकातून मांडण्यात आला आहे.

मागता क्षणी हवी ती गोष्ट हवीच अशी अपेक्षा असणाऱ्या आजच्या युवावर्गासाठी या पुस्तकाचे महत्त्व अधिकच आहे. स्वामी विवेकानंदांच्या विचारांमधील राष्ट्रजागरणाची प्रेरणा आणि एकनाथजी रानडे यांच्या कार्यातील संघटनशक्ती यांचा परिचय करून देणारे हे पुस्तक युवकांना ‘मोठे ध्येय आणि त्यासाठी सामूहिक प्रयत्न’ यांची ताकद जाणवून देते. आपल्या भारतासाठी या स्मारकाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, याची साक्ष पुस्तकाच्या वाचनातून पटते.

स्वामी विवेकानंदांच्या जीवनात कन्याकुमारीला विशेष स्थान आहे. डिसेंबर १८९२ मध्ये ते कन्याकुमारी येथे आले आणि समुद्रातील या शिलेवर ध्यानमग्न झाले. भारताच्या गौरवशाली इतिहासाचे चिंतन करतानाच

देशासमोरील दारिद्र्य, अज्ञान आणि सामाजिक समस्यांचाही त्यांनी विचार केला. भारताच्या पुनरुत्थानासाठी कार्य करण्याचा दृढ संकल्प त्यांच्या मनात याच चिंतनातून अधिक स्पष्ट झाला. पुढे त्यांनी भारतीय अध्यात्म, संस्कृती आणि मानवतेचा संदेश जगभर पोहोचवला. त्यामुळे त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या वेळी जानेवारी १९६२ मध्ये त्यांच्या स्मृतीशी जोडलेल्या या शिलेवर स्मारक उभारण्याची कल्पना ही केवळ श्रद्धेची बाब न राहता राष्ट्रीय प्रेरणेचे प्रतीक झाली.

मात्र स्मारक उभारणीचा मार्ग प्रचंड अडचणीचा होता. विविध प्रशासकीय, सामाजिक आणि तांत्रिक अडचणी, मतभेद आणि आर्थिक आव्हाने यांचा सामना करावा लागला. या संपूर्ण कार्याला व्यापक राष्ट्रीय स्वरूप देण्यात एकनाथजी रानडे यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली. त्यांनी विविध स्तरांवरील व्यक्ती, संस्था आणि समाजघटकांना एका ध्येयाभोवती एकत्र आणले. अडचणींवर मार्ग काढत त्यांनी स्मारक उभारणीच्या कार्याला देशव्यापी लोकचळवळीचे स्वरूप दिले. हा संपूर्ण गौरवशाली इतिहास या पुस्तकातून उलगडतो.

स्वामी विवेकानंद यांचे ‘उठा, जागे व्हा आणि ध्येयप्राप्ती होईपर्यंत थांबू नका’ हे वचन प्रत्यक्ष आचरणात आणणे म्हणजे काय, हे समजण्यासाठी प्रत्येकाने किमान एकदा हे पुस्तक वाचायलाच हवे

. 

गुरुवार, १० सप्टेंबर, २०२६

लोकमान्य टिळकांच्या राजकीय जीवनावर भाष्य करणारे चरित्र - मंडालेच्या राजबंदी

आपल्या प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाला विविध कंगोरे असतात , असे मानसशात्रात मानले जाते . या सर्व कंगोरेच्या एकत्रीकरणतुंन आपले व्यक्तिक्त्व घडते .एकाचवेळी सर्वांच्या सर्व कंगोरे सामोरे येतीलच असे नाही .किंबहुना येतच नाहीत. त्यामुळे एखाद्याला आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्तवाचे आकलन होईलच अस ठामपणे सांगता येत नाही . आपल्या सारख्या सर्वसाम्याची ही  कथा तर स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक यांच्यासारख्या बहुआयामी प्रकांड पंडित तीक्ष्ण बुद्धीच्या व्यक्तिमत्वाविषयी ही बाब तर आणखी  प्रखर होते. 
लोकमान्य टिळकांचीच गोष्ट करायची झाल्यास त्याच्या राजकीय सुधारणा आधी  आणि सामाजिक सुधारणा नंतर  याविषयी च्या मातांना महत्व देयचे की सामाजिक एकतेच्या माध्यमातून जातिभेद मिटत असल्याने सामाजिक सुधारणांच्या भाग म्हणता येईल अश्या  छत्रपती शिवाजी महाराज यांची  जयंती, सार्वजनिक गणेशोत्सव यांचा विचार करत त्यांनी काही प्रमाणात  सामाजिक सुधारणा देखील केल्या असे म्हणायचे असा प्रश्न निर्माण होतो . माझ्यामते या सारख्या प्रश्नाचे ऊत्तर हवे असल्यास आपणास या सारख्या थोर  व्यक्तिमत्वाच्या विविध कंगोरेना समोर ठेवत लिहिलेली चरित्रे मदत करतात . लोकमान्य टिळकांच्या पहिल्या राजद्रोहाच्या बंदिवासला १०० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार अरविंद गोखले यांनी लिहिलेले आणि राजहंस प्रकाशनतर्फे प्रकाशित मंडालेच्या राजबंदी हे पुस्तक याच प्रकारचे आहे.  लोकमान्य टिळकांच्या  राजकीय जीवनावर भाष्य करणारे चरित्र म्हणजे मंडालेच्या राजबंदी असे आपण म्हणू शकतो  

अरविंद गोखले लिखित आणि राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेले ‘मंडालेचा राजबंदी’ हे पुस्तक लोकमान्य टिळकांच्या अढळ विचारशक्तीची, राष्ट्रनिष्ठेची आणि संघर्षाची प्रभावी ओळख करून देते.एखाद्या राष्ट्रनेत्याला आपल्या देशापासून हजारो किलोमीटर दूर नेऊन तुरुंगात डांबले, तर त्याचा आवाज थांबेल आणि त्याचे विचारही थांबतील, असे सत्ताधाऱ्यांना वाटू शकते. मात्र असे वाटणे चुकीचे ठरू शकते याची जाणिव लोकमान्य टिळकांच्या बंदिवासातून इंग्रजांना कोणता प्रकारे झाली याची माहिती आपणस या ३०० पानी  पुस्तकातून मिळते . 

भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या योगदानाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. ब्रिटिश सत्तेविरुद्ध निर्भीडपणे आवाज उठवल्याची किंमत त्यांना कारावासाच्या रूपाने मोजावी लागली. भारतापासून दूर असलेल्या मंडाले येथे त्यांना ठेवण्यात आले. अपरिचित वातावरण, कठीण परिस्थिती,
एकाकीपणा आणि शारीरिक कष्ट यांमुळे हा काळ त्यांच्या मनोधैर्याची कसोटी पाहणारा होता. मात्र
राष्ट्रकार्यासाठी समर्पित झालेल्या टिळकांची विचारशक्ती आणि आत्मविश्वास या प्रतिकूल परिस्थितीतही डळमळला नाही. आपल्या  कारागृहातील कालावधीचा सुयोग्य वापर करतआर्टिक होम ऑफ वेदाज आणि गीतारहस्य या महान ग्रंथाची रचना कारण्यासह, जर्मनी पाली भाषा सवयंअध्यायाच्या मार्फत कोणत्या पद्धतीने आत्मसात करायच्या  वस्तुपाठच त्यांनी त्यांनी आपल्या आचरणतून कोणत्या पद्धतीने घालून दिला , हे आपल्यास या पुस्तकातून समजते . 

लोकमान्य टिळकांना त्यांच्या आयुष्यात जे तीन कारावास भोगायला लागले त्यापैकी सर्वत कठीण कारावास असलेल्या मंडालेच्या संदर्भ देऊन शीर्षक असलेल्या या पुस्तकात अरविंद गोखले यांनी  मंडालेच्या कारावासाकडे केवळ एका ऐतिहासिक घटनेच्या रूपात पाहिलेले नाही. त्या घटनेमागील राजकीय परिस्थिती, टिळकांचे व्यक्तिमत्त्व, त्यांची मानसिकता आणि राष्ट्रवादी विचार यांचा मागोवा घेत त्यांनी या पर्वाचे अधिक व्यापक चित्र उभे केले आहे. त्यामुळे वाचकाला टिळकांच्या जीवनातील एक महत्त्वाचा कालखंड समजतो आणि त्याचवेळी तत्कालीन भारताचे राजकीय वातावरणही उलगडत जाते. मी वाचली ती पुस्तकाची ४ आवृत्ती होती याचवथ्या आवृत्तीत आधीच्या तीन आवृत्तीत नसलेल्या लोकमान्य टिळकांना भोगाव्या लागलेल्या पहिल्या कारावासाची गोष्ट देखील समाविष्ट केली आहे  १७  प्रकरणात विभागलेल्या या पुस्तकातील ९ वे प्रकरण लोकमान्य टिळकांच्या  दुसऱ्या राजद्रोहाच्या खटल्याची माहिती देते . पण क्रमांक १३१ ते २०२ असे सुमारे ७० पाने असलेल्या या प्रकरणात या खटल्यात न्यायालयासमोर आलेला युक्तिवाद मांडण्यात आला आहे ज्याद्वारे लोकमान्य टिळकांच्या बुद्धिमत्तेची आपणासझलक पाहायवास मिळते. लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर
यांच्या राजकीय सुधारणा पहिले की  सामाजिक सुधारणा पहिले य वादावर पहिल्या प्रकरणात काही प्रमाणात उल्लेख केला आहे जे ५ पानाचे आहे त्यानंतर सुमारे अर्ध्या ते पाऊण  एका पानाच्या अपवाद वगळता संपूर्ण पुस्तक लोकमान्य टिळकांचार राजकीय त्यातही त्यांना भोगायला लागलेल्या २ राजद्रोहविषयी माहिती देते   स्वातंत्र्य हे केवळ राजकीय ध्येय नसून त्यासाठी वैयक्तिक सुख-सोयींचा त्याग करण्याची तयारी असावी, हा संदेशलोकमान्य टिळकांनी  त्यांच्या जीवनातून दिल्याचे पुस्तक वाचताना  प्रकर्षाने जाणवते 

या पुस्तकाचे आणखी एक महत्त्व म्हणजे ते इतिहासाकडे पाठ्यपुस्तकी नजरेने पाहण्याऐवजी त्यामागील मानवी आणि वैचारिक पैलू समजून घेण्याची संधी देते. कारावासातील एकाकीपणा आणि संकटे यांचा सामना करताना ध्येयाशी प्रामाणिक राहण्याची टिळकांची वृत्ती वाचकाला प्रेरणा देते. त्यातून स्वाभिमान, धैर्य, चिकाटी, राष्ट्रनिष्ठा आणि प्रतिकूल परिस्थितीतही न खचण्याची शिकवण मिळते.आज स्वातंत्र्य आपल्यासाठी सहज
उपलब्ध असलेले वास्तव आहे. त्यामुळे त्यामागे असलेला त्याग आणि संघर्ष अनेकदा विस्मरणात जातो. अशा वेळी ‘मंडालेचा राजबंदी’सारखे पुस्तक इतिहासातील संघर्षांची केवळ आठवण करून देत नाही, तर त्या संघर्षातून निर्माण झालेल्या मूल्यांचा पुनर्विचार करण्यास भाग पाडते.

एका राजबंदीच्या कारावासाची कथा म्हणून सुरू होणारे हे पुस्तक अखेरीस विचारांच्या स्वातंत्र्याची, अढळ राष्ट्रनिष्ठेची आणि ध्येयासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या व्यक्तिमत्त्वाची कथा बनते. इतिहासाची आवड असणाऱ्या तसेच प्रेरणादायी चरित्रात्मक लेखन वाचू इच्छिणाऱ्या प्रत्येक वाचकाने अनुभवावे असे हे पुस्तक आहे.

सोमवार, ३१ ऑगस्ट, २०२६

प्रवास एका ध्यासपुर्तीचा 'माझंही एक स्वप्न होतं’

अमिताभ बच्चन यांच्या नेत्रदानाविषयी टिव्हीवरील एका  जाहिरातीमध्ये एक वाक्य आहे त्यावेळेस कॅमेरा त्यांच्या पायावर स्थिर असतो कुछ लोगों के लिए मेरी आवाज ही मेरी पहचान है!  भारतातील सर्वात मोठा सहकारी दुग्ध प्रकल्प असणाऱ्या अमूल बाबत सुद्धा आपल्याला असेच म्हणता येईल भारतातील दुग्ध प्रकल्प म्हणजे अमूल असीच जगभरात फार मोठ्या प्रमाणात ओळख आहे. अमुल टेस्ट ऑफ इंडिया अमुल दूध पीता हे इंडिया अर्टली बर्टली डेलिशियस अमुल या  अनेक स्लोगननी अमुलला आपल्या भारताच्या घराघरात स्थान दिले आहे. मी एस पी कॉलेजमध्ये शिकत असताना स्पर्धा परिक्षेचा सुद्धा अभ्यास करत होतो त्यावेळेस कॉलेज संपल्यावर क्लासला जाण्याचा आधी जो थोडासा मोकळा वेळ मिळत असे. त्यावेळेस पोट भरण्यासाठी मी अमुल कुल  पीत असे. आपला देखील अमुलबाबत हाच अनुभव असेल असो 
गुजरात मधील काहीसा दुष्काळी भागातील असणाऱ्या आनंद या गावी  केरळी ख्रिश्चन असलेल्या वर्गिस कुरीयन यांनी  कष्टाने उभारलेल्या प्रकल्प म्हणजे अमुल. भारतातील दुधाचे उत्पादन वाढावे यासाठी  वर्गीस कुरियन यांनी दिलेल्या योगदानामुळे आपण त्यांना मिल्क मॅन ऑफ इंडिया असे म्हणतो. त्यांनी अमुलच्या उभारणीतील योगदान त्यासाठी त्यांनी केलेले कष्ट त्यांना अमूल उभारण्याची प्रेरणा याविषयी त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलेले आहे. आपल्या सुदैवाने राजहंस प्रकाशन तर्फे प्रकाशित 'माझे एक स्वप्न होतं' या त्यांच्या अनुवादित आत्मचरित्रात हे आपणास मराठी भाषेत वाचायला मिळते.या पुस्तकाचा मराठी अनुवाद सुजाता देशमुख यांनी केला आहे.
वर्गीस कुरियन यांचा प्रवास केवळ वैयक्तिक यशाचा नव्हता. गुजरातमधील आनंद येथे काम करताना त्यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या जवळून पाहिल्या. शेतकऱ्यांना त्यांच्या दुधाचा योग्य मोबदला मिळावा,मध्यस्थांवरील अवलंबित्व कमी व्हावे आणि दूध उत्पादकांच्या मालकीची सक्षम सहकारी व्यवस्था उभी राहावी, या विचारातून त्यांच्या कार्याला दिशा मिळाली. याच प्रयत्नांतून ‘अमूल’ची सहकारी चळवळ बळकट झाली आणि पुढे भारतीय दुग्धक्षेत्रात मोठे परिवर्तन घडले.या वाटचालीत अडचणींची कमतरता नव्हती. नोकरशाही, जुन्या कार्यपद्धती, हितसंबंध, राजकीय हस्तक्षेप, बाजारातील स्पर्धा आणि परदेशी कंपन्यांचे वर्चस्व अशा अनेक आव्हानांना कुरियन यांना सामोरे जावे लागले. मात्र स्पष्ट ध्येय, व्यवस्थापनकौशल्य आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी या अडथळ्यांवर मात केली. त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू स्वतःचे वैयक्तिक यश नसून शेतकऱ्यांचे सक्षमीकरण हा होता.
सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सामान्य शेतकऱ्याला उत्पादन व्यवस्थेचा मालक आणि विकासाचा
भागीदार बनविण्याची त्यांची कल्पना अत्यंत महत्त्वाची होती. हे सर्व आपल्या या आत्मचरित्रात वाचायला मिळते.
या आत्मचरित्राचे वैशिष्ट्य म्हणजे कुरियन केवळ आपल्या यशाची गाथा सांगत बसत नाहीत. संघर्ष, अडथळे, व्यवस्थेतील त्रुटी आणि विरोधाभास यांचीही ते स्पष्टपणे नोंद करतात. त्यामुळे हे पुस्तक एका व्यक्तीच्या आत्मकथनापेक्षा एका मोठ्या सामाजिक-आर्थिक परिवर्तनाचा ग्रंथ सुद्धा होते.माझंही एक स्वप्न होतं’ वाचताना एक मोठे परिवर्तन घडवून आणण्यासाठी केवळ स्वप्न पाहणे पुरेसे नसते; त्या स्वप्नाला स्पष्ट ध्येय, योग्य दिशा, संघटनकौशल्य, परिश्रम आणि अडचणींवर मात करण्याची जिद्द यांची जोड द्यावी लागते, हा संदेश देखील आपणाला मिळतो.म्हणूनच वर्गीस कुरियन यांचे हे आत्मचरित्र विद्यार्थी, उद्योजक, शेतकरी, व्यवस्थापनाचा अभ्यास करणारे आणि समाजपरिवर्तनाची इच्छा बाळगणाऱ्या प्रत्येकाने वाचायलाच हवे.

शनिवार, २९ ऑगस्ट, २०२६

सध्याच्या ऑनलाईनच्या तडाख्यात टिकून राहिलेले पाक्षिक 'वाटसरू'

सध्या सर्वच गोष्टी सहजतेने ऑनलाइन मिळत असल्याने छापील माध्यमांना काहीसा कठीण का आला आहे.  घटलेली वाचक संख्या आणि या घटलेल्या वाचक संख्येमुळे  रोडवलेल्या जाहिराती.कमी झालेल्या  जाहिराती मुळे घसरलेले  उत्पन्न आणि कमी उत्पानमुळे इच्छा असून देखील अनेक उपक्रम राबवता येणे अवघड होणे आणि  उपक्रम नसल्यामुळे वाचक संख्या अजूनच कमी होणे  आणि परत सुरुवातीपासून सांगितलेले चक्र सुरू  सुरु होणे या चक्रात  सध्या छापील नियतकालिके  अडकलेली आढळतात. या चक्रामुळे अनेक नामवंत प्रतिष्ठित अशी नियतकालिकाने बंद देखील पडली. इंग्रजी आणि हिंदी भाषेतील नियतकालिकांची स्थिती अन्य प्रादेशिक नियतकालिकांपेक्षा तुलनेने काहीशी बरी आहे इतकेच  .लॉक डाऊन नंतर इंग्रजीतील सायन्स रिपोर्टर तसेच इकोनॉमिकल अँड पोलिटिकल विकली सारखी नामांकित इंग्रजी नियतकालिके बंद पडली लोकसत्ता चे भावंडं असलेले लोकप्रभा हे साप्ताहिक आणि  मूळचे गुजराती असलेले मात्र मराठी सारख्या अनेक भाषेत प्रसिद्ध होणारे चित्रलेखा हि दोन दोन साप्ताहिके बंद होऊन बराच काळ लोटला .  मात्र असे असून देखील काही निययतकालिके अजून देखील सुरु आहेत  पुणे शहरातून प्रसिद्ध होणारे पाक्षिक 'वाटसरू' त्यापैकीच एक . 

सध्या सुरु असलेल्या मराठी  नियतकालिकांचा विचार करता अत्यंत तरुण म्हणजे जेमेतेम २८- २९ वर्षाच्या या  पाक्षिकाचे १६ जुलै ते ३१ जुलै, १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट आणि १६ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट असे तीन अंक मी नुकतेच वाचले. काही मोजक्या चित्रांचा अपवाद वगळता पूर्णतः कृष्णधवल असलेल्या आणि जाहिराती देखील मोजक्याच असलेल्या या पाक्षिकामुळे छापील व्यवसाय चालवणे सध्या किती अवघड आहे.हे नव्याने उमगले . सध्या मराठीत जी हाताच्या बोटावर मोजता येतील अशी नियतकालिके जसे साप्ताहिक विवेक, साधना, सकाळ 
मार्मिक ही सर्व रंगीत असताना भलेही कृष्णधवल स्वरूपात अनेक छापू मात्र समाजाला काहीतरी वैचारिक खाद्य पुरवूनच हि तळमळ मला तरी सुखावून गेली 

तिन्ही अंक ५० पानाचे होते तसेच किंमत ४५ रुपये होती. जी सध्या छापल्या जाणाऱ्या साप्ताहिकाचा विचार करता साप्ताहिक विवेक, साप्ताहिक मार्मिक  आणि साप्ताहिक सकाळचा  अपवाद  करता योग्यच म्हणता येईल  विवेक आणि सकाळ,मार्मिक  यांना अन्य उद्योगाचा आधार असल्याने ही  साप्ताहिके १५ ते २५ रुपयात मिळू शकतात.तसेच त्यामध्ये जाहिराती देखील मोठ्या प्रमाणात असतात या अश्या वातवरणात जाहिरातीचे प्रमाण खूपच कमी ठेवून वाचकांना वैचारिक साहित्य उपलब्ध करून देण्याचा प्रकाशकांचा प्रयत्न खरोखरीच कौतुकास्पदच म्हणावा लागेल 

अप्पा बळवंत चौकातील वृत्तपत्र आणि नियतकालिके विकणाऱ्या विक्रेत्याकडे सायन्स रिपोर्टरची चौकशी करताना गवसलेल्या या साप्ताहिकाचे संपादक मंडळ बघितले असता यामध्ये डाव्या चळवळीचा संबंध असलेल्या व्यक्तींचा भरणा अधिक जाणवत असला तरी लेखाचा सुरु मोठ्या प्रमाणात संतुलित आढळला
.साप्ताहिकात घेतलेल्या विषयामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वैविध्य आढळले अन्य सप्तहहिकमध्ये मला तरी ना आढळलेली गोष्ट अर्थात इंग्रजी चित्रपटांची आणि पुस्तकाची विशेष दाखल तसेच इतर भाषेतील सुप्रसिद्ध कवितांचे मराठी भाषेत भाषांतर करणे या गोष्टी या साप्ताहिकाच्या संपादक मंडळाचे कौतुक करणे योग्यच ठरेल 
डाव्या विचारसरणीमुळे देशाची प्रगती काहीशी मंदावली असली तरी हिंदू धर्मात शैव पंथ आणि वैष्णव पंथ आहेत आणि सर्व हिंदूंनी त्यांचे अस्तिव मान्य केले आहे अनेकांना आवडणार नाही अशी मते मांडणाऱ्या चार्वाक याना महर्षी म्हणून गौरवले आहे. त्याच प्रमाणे डाव्या विचारसरणीचे अस्तिव मान्य करत सध्याच्या ऑनलाईनच्या तडाख्यात टिकून राहिलेले पाक्षिक  'वाटसरू' म्हणून आपण त्यांच्याकडे बघायला हवे .विचारसरणी काहीशी बाजूला सारत अजून देखील छापील नियतकालिक स्वरूपात प्रसिद्ध होणारे म्हणून आपण त्यांस समर्थन देणे योग्य ठरेल 


स्वामी विवेकानंद यांच्या मानस कन्येचा जीवन प्रवास उलगडवणारे पुस्तक कर्मयोगीनी भगिनी निवेदीता

जन्माने आयरिस धर्माने सुरुवातीला ख्रिस्ती मात्र स्वामी विवेकानंद यांच्या सानिध्यात आल्याने आपल्या इतकीच भारतीय झालेली स्वामी विव...