मानसशास्त्रात व्यक्ती स्वतःच्या विषयी जो काही विचार करते, त्यानुसार तिचे व्यक्तिमत्त्व घडते, असा एक सिद्धांत आहे. या सिद्धांतानुसार जर व्यक्तीने स्वतः विषयी नकारात्मकच विचार केला तर व्यक्तीचा आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात कमी होतो आणि व्यक्तीमध्ये काही कारण नसताना स्वतः कमीपणा घेऊन दुसऱ्याला, त्याची त्या प्रकारची योग्यता नसताना देखील, मोठेपणा देतो. “मी कायमच हरण्यासाठीच जन्म झालेला आहे. मी पूर्वी कधीही जिंकलो नव्हतो; भविष्यात देखील जिंकू शकणार नाही” असे त्या व्यक्तीला वाटायला लागते. व्यक्तीला कायम त्याची चूकच सांगितल्या, त्याच्या चांगल्या बाबींची जाणीवच त्याला करून दिली नाही तर व्यक्तीमध्ये या प्रकारची मानसिक विकृती निर्माण होते, असे या सिद्धांताबाबत मानसशास्त्रज्ञ सांगतात. त्यावेळी त्या व्यक्तीला त्याच्या पूर्वायुष्यातील सकारात्मक बाबी सांगाव्या लागतात.
कोणताही समाज हा व्यक्तींचा समूहच असतो. जर एखाद्या व्यक्तीसमूहातील बहुसंख्य व्यक्तींना असे न्यूनगंडाने ग्रासले तर तो समाज एकत्रितपणे नकारात्मक विचार करायला लागतो. अशा वेळी या लेखाच्या सुरुवातीला व्यक्तीबाबत सांगितले तसेच या समाजाबाबत करावे लागते. या समाजाच्या सकारात्मक बाबी त्याला समजावून सांगाव्या लागतात. त्या समाजाच्या वैभवशाली घटना, प्रसंग, त्या समाजाने मिळवलेले विजयाचे स्मरण त्या समाजाला करून द्यावे लागते.
इतिहासाचे विविध टप्पे असतात. या विविध टप्प्यांपैकी एखाद्या टप्प्यावर प्रत्येक समाजाने कधीतरी यशाची चव चाखली असते; कधी अपयशाचा सामना केलेला आढळतो. आपल्या भारताचा विचार करता प्राचीन कालखंडात मोडणारा संपूर्ण भाग तसेच मध्ययुगात मोडणाऱ्या कालखंडाचा सुरुवातीचा कालखंड हा भारताचा विजयाचा, अभिमानाचा कालखंड समजला तर वावगे ठरणार नाही. या वैभवशाली कालखंडात गुप्त साम्राज्य, मौर्य साम्राज्य, आपल्या महाराष्ट्राचा विचार करता सातवाहन कालखंड याचा यात समावेश करता येईल. तरमध्ययुगाच्या कालखंडातील एकूण भागांपैकी सुरुवातीच्या ४५ ते ५५ टक्क्यांच्या नंतरचा कालखंड भारतासाठी निराशाजनक म्हणता येईल असा आहे. आपल्या कडे ज्याबाबत सातत्याने काहीसा संताप व्यक्त केला जातो तो पश्चिमी आणि मध्य आशियातून होणाऱ्या धार्मिक आक्रमणांचा हाच तो निराशाजनक कालखंड.
ब्रिटिश राजवटीत त्यांच्या वैयक्तिक हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी आपल्याला प्रामुख्याने मध्ययुगीन इतिहासकालखंडातील शेवटचा ५० टक्के भागच शिकवण्यात आला, जो काहीसा निराशाजनक आहे. लेखाच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे त्यामुळे समाजावर काहीसे नैराश्य आले. याला उत्तर काय? याचा विचार जेव्हा समाजाचे हित बघणाऱ्या व्यक्ती करू लागल्या त्यावेळी भारताच्या वैभवशाली इतिहासाची—अर्थात प्राचीन कालखंडातील आणि मध्ययुगाच्या सुरुवातीचा कालखंडातील—माहिती देण्याची गरज लक्षात आली. आणि त्यानुसार समाजाचे हित इच्छिणाऱ्या व्यक्तींनी कार्य करायला सुरुवात केली. या व्यक्तीमध्ये प्रामुख्याने नाव घ्यावेच लागते ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे. त्यांनी *सहा सोनेरी पाने* हा ग्रंथ लिहून भारताचा गौरवशाली इतिहास समाजासमोर आणण्याचे काम केले. हा ऐतिहासिक ग्रंथ मी नुकताच वाचला.
पूर्वी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेचा (यूपीएससीची परीक्षा म्हणून ओळखली जाणारी परीक्षा मुळात यूपीएससीकडून ज्या विविध प्रकारच्या १७ परीक्षा घेतल्या जातात त्यापैकी एक; मात्र इतर १६ परीक्षांबाबत पुरेशी माहिती नसल्याने “यूपीएससीकडून तेवढीच परीक्षा घेतली जाते” असे समजून) अभ्यास करताना जो इतिहास अभ्यासाला होता तो किती एकांगी होता हे मला या पुस्तकातून समजले.
इतिहासाचे अत्यंत शास्त्रीय पद्धतीने वर्गीकरण केले तर प्रागैतिहासिक काळ (Prehistory), आद्यऐतिहासिक काळ (Proto-History), प्राचीन काळ, मध्ययुगीन काळ आणि अर्वाचीन काळ असे वर्गीकरण करण्यात येते. प्रागैतिहासिक काळात (Prehistory) माणसाला लेखनकला अवगत नव्हती; तर आद्यऐतिहासिक काळात (Proto-History) मानवाला लेखनकला माहिती होती, मात्र त्यावेळी काय लिहिले आहे हे आपल्याला आज माहिती नाही असे समजण्यात येते. भारताचा विचार करता सिंधू–सरस्वती संस्कृतीचा कालखंड हा आद्यऐतिहासिक (Proto-History) काळात समजला जातो. *सहा सोनेरी पाने* या पुस्तकात आद्यऐतिहासिक काळाचा ओझरता उल्लेख सुरुवातीच्या प्रकरणात करत स्वातंत्र्यवीर सावरकर आपल्याला थेट इ.स.पूर्व ५ व्या शतकाच्या सुरुवातीस घेऊन जातात.
या पुस्तकात भारताच्या कोणत्या वैभवशाली घटनांचा उल्लेख करण्यात आलेला आहे, या विषयी यापूर्वी हजार वेळा सांगण्यात आल्याने त्याची पुनरावृत्ती करत नाही. तर लेखाच्या पाचव्या परिच्छेदालाच मी पुढे घेऊन जाऊ इच्छितो. तर भारतीयांनी प्राचीन काळी त्यांच्यावर होणारे आक्रमण किती शूरपणे परतवून लावले? युरोपीय सत्तांनी स्वतःच्या पराभवाचादेखील विजयच झाला असे खोटे कसे सांगितले? प्राचीन भारतातील समाजजीवन आणि प्रशासन कोणत्या प्रकारचे होते? भारत पूर्वीपासूनच यूरोपीय सत्तांना कोणत्या प्रकारे खुणवत होता? याविषयी माहिती मला या पुस्तकातून मिळाली.
भारत आता महासत्ता होतोय असे नाही; तर भारत पूर्वी देखील महासत्ता होता. मात्र काही कारणाने आपण ते पद गमावले, इतकेच. ते का गमावले आणि भारत पुन्हा एकदा विश्वगुरू झाल्यावर इतिहासात झालेल्या चुका टाळण्यासाठी त्या माहिती असाव्यात—ज्यामुळे त्या टाळण्यासाठी काय करता येईल हे वाचकास समजले—आणि आपण वेळीच सावध होऊन कोणत्या प्रकारे त्या चुका टाळू शकतो हे समजण्यासाठी प्रत्येकाने, तो कोणत्याही विचारधारेला मानणारा असो, हे पुस्तक वाचायला हवे असे मला वाटते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा