तंत्रज्ञानाचाच फायदा घेत त्यात पारंगत होण्याचा विचार केला असता,आपली फसगत होण्याचा धोका देखील मोठा प्रमाणात आहे. ऑफलाईन जगात ज्याप्रमाणे चांगले लोक आहेत वाईट लोक आहेत.तोच प्रकार ऑनलाईन जगात आहे. ऑफलाईन जगात व्यक्ती समोर असल्याने त्याचा देहबोलीतून आपण सदर व्यक्ती चांगली की वाइट हे ओळखु शकतो.मात्र तंत्रज्ञानाचा जगात ऑनलाईन पद्धतीने संवाद साधणारी व्यक्ती समोर नसल्याने, सदर व्यक्ती चांगल्या हेतूने संवाद साधत आहे की, त्याचे हेतू वाइट आहे.हे समजत नाही. सध्या गाजत असणारे 'डिजीटल अरेस्ट' हे फसवणूकीचे प्रकार हे या धोक्याचे एक उदाहरण म्हणता येईल.मात्र लेखाच्या सुरवातीलाच सांगितले त्या प्रमाणे आपल्याला आपले जीवन तंत्रज्ञान स्नेही सध्या काळाची गरज आहे. या कात्रीतून मार्ग काढायचा असल्यास आपणाला विश्वासार्ह्य मार्गदर्शकाची गरज निर्माण होते, आणि ही गरज आपली सहजतेने पुर्ण होते.ती राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित आणि डॉ.संजय तुंगार,आणि सुधीर साबळे यांनी एकत्रीतपणे लिहलेल्या, 'सायबर अटॅक' या पुस्तकामुळे.नाशिकमधील सर्वात जूने वाचनालय असलेल्या सावाना अर्थात सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्या मदतीने मी सदर पुस्तक नुकतेच वाचले.
या पुस्तकात सध्या विशेष चर्चेत असलेल्या ,तूमच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे, ही भुलथप तसेच हनी ट्रॅप, व्हाटसप हॅक होणे,धर्मांतराचा खेळ, ऑनलाईन गेमचे मोहजाल, डेबीट कार्ड क्लोनिंग,सेक्शटार्शन ,झूम मिटिंगद्वारे होणारी,फिशिंगद्वारे होणारी,टिंडर सारख्या प्लॅटफॉर्म होणारी फसवणूक, ऑनलाईन कर्जाद्वरे फसवणूक, कशी होते,त्यापासून कोणत्या प्रकारे बचाव करावा, ऑनलाईन जगात अती घाई कशी अडचणीची ठरते.तसेच ऑनलाईन जगात क्लिक करताना,काय काळजी घेयला हवी, ऑनलाईन सुविधेमुळे घर सोडून गेलेल्या व्यक्ती कोणत्या पद्धतीने सापडू शकतात ,या सारख्या सुमारे 35 गोष्टी वेगवेगळ्या प्रकरणाद्वारे सांगण्यात आलेल्या आहेत.पुस्तक तांत्रीक माहिती देत असले तरी पुस्तकाची भाषा सहजसोपी चटकन समजणारी आहे.पुस्तकाच्या शेवटी तीन परिशिष्टाद्वारे सायबर गुन्हेगारीबाबतची भारतातील सद्यस्थिती, आपल्याबाबत सायबर गुन्हा घडल्यास कोणती पाउले उचलावीत,तसेच पोलीस स्टेशन आणि बँकेला कोणत्या स्वरूपात अर्ज करावा याबाबत सांगण्यात आले आहे.
या पुस्तकाच्या दोन लेखकांपैकी एक असणारे डॉ.संजय तूंगार हे पोलिस दलात कार्यरत आहेत.डॉ. तुंगार यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील आयक्तलयात कार्यरत असताना, तेथील सायबर ठाण्याचे काम बघीतले.या दरम्यान त्यांनी अनेक गुन्ह्मांची उकल केली आहे.सायबर गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधिकारी कर्मचारी यांना विशेष प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रमात, एस.ओ.पी.तयार करण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता .तर दुसरे लेखक सुधीर साबळे हे ज्येष्ठ पत्रकार आहेत.त्यांना पत्रकारीतेचा २५वर्षाचा अनुभव आहे. सुधीर साबळे यांनी पत्रकारीता करताना, सायबर गुन्हांविषयी मोठ्या प्रमाणात वार्तांकन केले आहे तसेच सायबर गुन्हे याबाबत त्यांनी अनेक प्रबोधनपर लेख आणि कथा लिहल्या आहेत. दोन्ही लेखकांना सायबर गुन्हे याबाबत असे सविस्तर ज्ञान असल्यामुळे पुस्तक अत्यंत माहितीपुर्ण झाले आहे.त्यामुळे डिजीटल अरेस्टया सारख्या फसवणूकीची बातमी आपल्याबाबत प्रसिद्ध होवू नये असे वाटल्यास पुस्तक नक्कीच वाचा.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा