जग फार मोठ्या विविधतेने नटलंय,सजलंय.यातील काहीच घटकांची, पैलूंची ओळख करून घेयची म्हटले तरी एकच काय अनेक मानवी जन्म अपुरे पडतील.इतकी विविधता जगात आहे. मग ही विविधता अनुभवयाची तर कशी? उत्तर अगदी सोप आहे, इतरांच्या चष्यातून बघत आपण जगाचे हे बहढंगी व्यक्तीमत्व सहज अनुभवू शकतो. इतर लोकांनी त्यांचे जे अनुभव शेअर केले आहेत,ते लिखित असतील तर वाचून किंवा व्हिडीओ स्वरूपात असतील तर बघून किंवा ऑडिओ स्वरूपात असतील तर ऐकुन आपण या अनुभवांच्या मदतीने आपण या विविध छटाच्या जगाशी स्वत:ला जोडुन घेत असतो.वेगवेगळ्या लोकांनी लिहिलेली प्रवासवर्णने, अनुभवकथने आपल्याला या बाबत खुपच छान मदत करतात. आपल्या सुद्दैवाने मराठीत हा प्रकार खुपच रूळला आहे. मराठी ही मातृभाषा असलेल्या अनेकांनी त्यांचे जगभरातील अनुभव मराठी भाषेत लिहून मराठीला अनुभवचा विचार करता श्रीमंत केले आहे. व्यवसायाने मुळच्या डॉक्टर असलेल्या मात्र आपल्या डॉक्टरिपेशापेक्षा आपले फिरण्याचे अनुभव जगाला पुस्तक रुपाने सांगितल्यामुळे प्रसिद्ध झालेल्या 'मीना प्रभू' या मराठीला श्रीमंत करणाऱ्यापैकीच एक.मी नुकतेच त्यांचे, 'माझे लंडन' हे पुस्तक वाचले.
या अनुभव कथनात मीना प्रभु यांनी त्यांचा लंडनमधील राहण्या दरम्यान अनुभवलेले विविध अनुभव अत्यंत सहजसोप्या भाषेत मांडले आहेत. बकिंगहॅम पॅलेस, थेम्स नदी, संग्रहालयं, कलादालनं, बगीचे आणि लंडन अंडरग्राउंड यांसारख्या ठिकाणांचं वर्णन करताना त्या केवळ माहिती देत नाहीत, तर त्या ठिकाणांचं सौंदर्य, इतिहास आणि वैशिष्ट्य जिवंत करतात. त्यांच्या लिखाणातून लंडन शहराचे समग्र चित्र आपल्यासमोर उभे राहते.
या पुस्तकाचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे मीना प्रभुचा पर्सनल आणि बॅलन्स ॲप्रोच. लंडनसारख्या जागतिक शहराकडे पाहताना त्या केवळ भव्यतेकडे बघत नाही तर तेथील संस्कृती, शिस्त, स्वच्छता आणि नागरिकांची जबाबदारीची जाणीव यांचाही अभ्यास करतात. भारतीय जीवनशैलीशी तुलना करताना त्या कुठेही अतिरेक नकरता विचारपूर्वक निरीक्षण मांडतात, ज्यामुळे वाचकाला वस्तूस्थितीची आपल्या भारतीयांकडे असलेल्या चांगल्या आणि वाईट गोष्टीची जाण येते
‘माझं लंडन’ हे पुस्तक माहितीपर असतानाच भावनिक पातळीवरही उत्तम आहे. मीना प्रभू यांच्या मनात निर्माण झालेला आपलेपणा आणि जिव्हाळा शब्दांतून जाणवतो, त्यामुळे वाचकही त्या शहराशी जोडला जातो. पुस्तकाची भाषा सहज, प्रवाही आणि आकर्षक असल्याने वाचताना आपण त्यात सहजतेने अधिकाधीक गुंतून जातो.एकूणच, ‘माझं लंडन’ हे पुस्तक केवळ एका शहराची ओळख करून देत नाही, तर जगाकडे पाहण्याची व्यापक आणि संवेदनशील दृष्टी विकसित करतं. त्यामुळे हे पुस्तक प्रत्येक वाचनप्रेमीसाठी प्रेरणादायी आणि वाचनीय ठरतं.


