यावर्षी मी प्रामुख्याने आत्मचरित्र, चरित्र आणि अनुभव कथन विषयक पुस्तकांचे वाचन करणे ठरवले आहे ,हे एव्हना आपणास माहिती झालेच असेल. मी आतापर्यंत, 'यस आय एम गिल्टी, बलुतं, उपरा, लोकवन आनंदवन, डायरी ऑफ ऍना फ्रॅंक ही पुस्तके वाचली आहेत . याच आत्मचरित्र, चरित्र आणि अनुभव कथन विषयक पुस्तकांच्या साखळीत सहजतेने समाविष्ट होऊ शकेल असे पुस्तक, ' कहाणी लंडनच्या आजीबाईची' सुद्धा मी नुकतेच वाचून पूर्ण केले आहे. माझे आजचे लेखन तुम्हाला या पुस्तकाविषयी सांगण्यासाठी
तर वाचक मित्रहो , इंग्रजीचा गंध सोडा, धड मराठी सुद्धा न येणाऱ्या विदर्भातील एका पूर्ण अर्थाने अशिक्षित असणाऱ्या राधाबाई बोरकर, ज्यांना लंडन देश आहे की एखादे शहर हे सुद्धा माहिती नाही. त्यांनी जिद्दीने प्रयत्नपूर्वक आणि कष्टाने उभारलेल्या लंडनमधील सुप्रसिद्ध हॉटेलची कथा या सांगण्यात आली आहे.सरोजिनी वैद्य लिखित १८८ पानी या पुस्तकाचे प्रकाशक आहेत राजहंस प्रकाशन. कष्ट केले की यश मिळतेच हा संदेश आपणांस या पुस्तकातून मिळतो.
१८ प्रकरणात विभागलेल्या या पुस्तकात आपणास स्वातंत्र्यपूर्व काळात तसेच स्वातंत्र्यानंतरचं सुरुवातीच्या काही वर्षात यवतमाळ जिल्हा आंणि लगतच्या मराठी प्रदेशातील समाजजीवन- लोकजीवन कसे होते ? स्त्रियांबाबतचा दृष्टिकोन कसा होता ? स्त्रियांबाबत अधिक सविस्तर बोलायचे झाल्यास पती निधनानंतरची स्थिती, बालविवाह, यांची माहिती मिळते . जे काहीसे महिलांबाबत वाईट या श्रेणीत मोडणारे आहे.महिलांविषयक अश्या काहिस्या प्रतिकूल परिस्थितीचा यशस्वी सामना करत, प्रसंगी जवळपास स्वतःच्या वयाइतकेच वय असलेल्या मुलांची आई होत या मुलांकडून मिळणारी अपमानाची वागणूक मूग गिळून सहन करत कष्टाने मेहनीतीने लंडनमध्ये स्वःताचे लॉजिंग आणि हॉटेल यशस्वीपणे उभारलेल्या राधाबाई बोरकर,यांची संघर्ष गाथा आपणास या पुस्तकातून वाचावयास मिळते लंडन शहरात राहत असलेल्या राधाबाई बोरकर यांना तेथील भारतीय त्यातही प्रामुख्याने महाराष्ट्रीयन समाज हा आजीबाई या नावाने ओळखत असल्याने, त्यांच्या या संघर्ष गाथेला ' कहाणी लंडनच्या आजीबाईंची हे नाव देण्यात आले आहे.
पुस्तकाची रचना हिंदी चित्रपटात दाखवतात त्या प्रमाणे पहिल्यांदा व्यक्तिमत्वाचा सत्कार आणि मग लहानपणापासूनची माहिती अश्या प्रकारे आहे .एलिझाबेथचा शिक्का असे शीर्षक असलेल्या पहिल्या प्रकरणात आजीबाईंची ओळख झाल्यावर दुसऱ्या प्रकरणात त्यांच्या जन्मापासून पहिल्या लग्नापर्यंतचा काळाविषयी माहिती मिळते तिसऱ्या प्रकरणात त्यांचा पहिला विवाह कोणत्या प्रकारे झाला याची तर चवथ्या आणि पाचव्या प्रकरणात त्यांच्या पहिल्या संसाराची आणि पती निधनानंतर दिराने दिलेल्या वागणुकीची, त्यांनी पती निधनानंतर कष्टाने केलेल्या मुलींच्या संगोपनाची माहिती मिळते . सहाव्या प्रकरणापासून अकराव्या प्रकरणापर्यंत राधाबाई बोरकर यांच्या दुसऱ्या लगाच्या विषयी माहिती मिळते ज्यामध्ये त्या परिवाराची माहिती,पहिल्या लग्नाचा वेळच्या दिराने जबरदस्ती लावून दिलेले लग्न, त्यांच्या लंडनपर्यतचा प्रवास , दुसऱ्या लग्नाच्यावेळी त्यानं मनुष्याच्या घोळक्यात राहून आलेले रितेपण, दुर्दैवाने त्यांच्या दुसऱ्या पतीचा झालेला मृत्यू दुसऱ्या पतीच्या निधनानंतर सावत्र मुलांनी दिलेली अत्यंत अपमानास्पद वागणूक याची माहिती मिळते.
आजीबाईंना ज्यामुळे खऱ्या अर्थाने भारतीयांमध्ये सम्मानाची ओळख मिळाली त्या त्यांनी लंडन शहरात २५ खूप लेन मध्ये उभारलेल्या लॉजिंग आणि हॉटेल विषयीची, त्यांनी ग्राहकांवर केलेल्या मायेची,स्वतःच्या कुटूंबियांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी घेतलेल्या कष्टाची, त्यांनी लंडन शहरात सुरु केलेल्या विविध उपक्रमांची, त्याच्या आयुष्याच्या अखेरच्या काही वर्षाची, त्यांच्या अंत्यविधीची आणि विविध प्रसिद्ध व्यक्त्तिमतांची त्यांच्या विषयीच्या मतांविषयी आपणास १२ ते १८ प्रकरणात माहिती मिळते.
लेखात सुरुवातीला सांगितले त्या प्रमाणे कष्ट केले की यश मिळतेच हा संदेश प्रत्यक्ष कश्या प्रकारे अस्तित्वात येतो हे समजण्यासाठी लंडनमधील या मराठी भाषिक महिला उद्योजिकेचे हे चरित्र किमान एकदा तरी वाचायलाच हवे



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा