या कन्याकुमारीचे मुख्य आकर्षण म्हणजे स्वामी विवेकानंद यांनी ज्या खडकावर बसून सलग तीन दिवस रात्र बसून ध्यान केले, त्या ठिकाणी उभारण्यात आलेले विवेकानंद शिला स्मारक. आपण पर्यटक म्हणून या ठिकाणी सहजतेने भेट देतो; मात्र त्याची उभारणी तितकी सोपी नव्हती. त्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. स्थानिक ख्रिस्ती धर्मीय लोक, तत्कालीन तामिळनाडू येथील राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्याकडून विविध परवानग्या मिळवत तसेच नागरिकांकडून निधी संकलन करत माननीय एकनाथजी रानाडे यांनी या राष्ट्रीय स्मारकाची उभारणी केली. हा संपूर्ण संघर्ष विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभागातर्फे प्रकाशित ‘कथा विवेकानंद शिला स्मारकाची’ या पुस्तकातून वाचावयास मिळतो.
मागता क्षणी हवी ती गोष्ट हवीच अशी अपेक्षा असणाऱ्या आजच्या युवावर्गासाठी या पुस्तकाचे महत्त्व अधिकच आहे. स्वामी विवेकानंदांच्या विचारांमधील राष्ट्रजागरणाची प्रेरणा आणि एकनाथजी रानडे यांच्या कार्यातील संघटनशक्ती यांचा परिचय करून देणारे हे पुस्तक युवकांना ‘मोठे ध्येय आणि त्यासाठी सामूहिक प्रयत्न’ यांची ताकद जाणवून देते. आपल्या भारतासाठी या स्मारकाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, याची साक्ष पुस्तकाच्या वाचनातून पटते.
स्वामी विवेकानंदांच्या जीवनात कन्याकुमारीला विशेष स्थान आहे. डिसेंबर १८९२ मध्ये ते कन्याकुमारी येथे आले आणि समुद्रातील या शिलेवर ध्यानमग्न झाले. भारताच्या गौरवशाली इतिहासाचे चिंतन करतानाच
देशासमोरील दारिद्र्य, अज्ञान आणि सामाजिक समस्यांचाही त्यांनी विचार केला. भारताच्या पुनरुत्थानासाठी कार्य करण्याचा दृढ संकल्प त्यांच्या मनात याच चिंतनातून अधिक स्पष्ट झाला. पुढे त्यांनी भारतीय अध्यात्म, संस्कृती आणि मानवतेचा संदेश जगभर पोहोचवला. त्यामुळे त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या वेळी जानेवारी १९६२ मध्ये त्यांच्या स्मृतीशी जोडलेल्या या शिलेवर स्मारक उभारण्याची कल्पना ही केवळ श्रद्धेची बाब न राहता राष्ट्रीय प्रेरणेचे प्रतीक झाली.मात्र स्मारक उभारणीचा मार्ग प्रचंड अडचणीचा होता. विविध प्रशासकीय, सामाजिक आणि तांत्रिक अडचणी, मतभेद आणि आर्थिक आव्हाने यांचा सामना करावा लागला. या संपूर्ण कार्याला व्यापक राष्ट्रीय स्वरूप देण्यात एकनाथजी रानडे यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली. त्यांनी विविध स्तरांवरील व्यक्ती, संस्था आणि समाजघटकांना एका ध्येयाभोवती एकत्र आणले. अडचणींवर मार्ग काढत त्यांनी स्मारक उभारणीच्या कार्याला देशव्यापी लोकचळवळीचे स्वरूप दिले. हा संपूर्ण गौरवशाली इतिहास या पुस्तकातून उलगडतो.
स्वामी विवेकानंद यांचे ‘उठा, जागे व्हा आणि ध्येयप्राप्ती होईपर्यंत थांबू नका’ हे वचन प्रत्यक्ष आचरणात आणणे म्हणजे काय, हे समजण्यासाठी प्रत्येकाने किमान एकदा हे पुस्तक वाचायलाच हवे
.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा