जीवनव्रतींच्या पाहिल्या काही वर्षांमधल्या तुकड्यांना मा एकनाथजींसारख्या कुशल संघटकाकडून यासंबंधीचं मार्गदर्शन मिळालं. त्यांच्या या व्याख्यानांपैकी काही व्याख्यानांचा संग्रह त्यांच्या पश्चात Sadhana of Service या नावानं प्रसिद्ध झाला. या इंग्रजी पुस्तकाचंच मराठी रूपांतर आहे. मात्र, पुस्तकाच्या मांडणीत मुळापेक्षा बरंच परिवर्तन केलेलं आहे. एकाच विषयावरचा मुळात अनेक प्रकरणांत विभागलेला मजकूर या पुस्तकात एकत्र आणला आहे. त्या दृष्टीनं आवश्यक ते फेरफारकरण्याचं स्वातंत्र्यही घेतलं आहे. तरीही अनेक ठिकाणी पुनरावृत्ती झाल्याचं दिसेल. त्या त्या भागात विषय स्पष्ट होण्याची आवश्यकता लक्षात घेऊन आणि व्याख्यानाचा ओघ टिकावा म्हणून ही पुनरावृत्ती ठेवली आहे
हे पुस्तक दोन भागात विभागले आहे पहिल्या भागातील व्याख्यानांमध्ये प्रामुख्यानं विचार केला आहे, तो व्यष्टिजीवनाचा. माणसाच्या अगदी बाल्यावस्थेपासून प्रारंभ करून त्याच्या टप्प्याटप्यानं होणाऱ्या प्रगतीचं चित्र एकनाथजींनी इथं स्पष्ट केलं आहे. मानवी जीवनाचं अंतिम ध्येय; अनेक जन्मांनंतरच हे ध्येय साध्य होत असल्यानं त्याचा टप्पा म्हणजे या जन्मीचं जीवितकार्य; या कार्यासाठी स्वीकारलेलं सेवेचं माध्यम आणि व्रत; एकदा हे सर्व ठरलं की, त्यानुसार करावा लागणारा जीवनाचा आराखडा; या आराखड्यानुसार व्रतस्थ जीवन जगत असताना पाळावे लागणारे विधिनिषेध, असावी लागणारी मनोभूमिका, स्वीकारावं लागणारं अनुशासन इत्यादी गोष्टींचा विचार या व्याख्यानांमध्ये आहे. हे विचार विवेकानंद केंद्रातला सेवाव्रती कार्यकर्ता डोळ्यांपुढे ठेवून सांगितलेले असले, तरीकार्यकर्ता नसणाऱ्या, पण आपल्या आयुष्याचं ध्येय समजून घेऊन ते गाठण्यासाठी प्रयत्न करू इच्छिणाऱ्या सामान्य माणसाच्या दृष्टीनंही ते मोलाचे आहेत.दुसऱ्या भागात आपण व्यष्टिजीवनाकडून समष्टीच्या विचाराकडे जातो. या सर्व व्याख्यानांमध्ये संघटना आणि राष्ट्र यांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्याला केलेले मार्गदर्शन आहे. संघटना, तिची आवश्यकता; सेवाभावी संघटनेची वैशिष्ट्ये; संघटनेतील कार्यकर्त्यांत आवश्यक असणारे गुण; संघटनेचं कार्य सुरळीत चालण्यासाठी त्याची व्हावी लागणारी विशिष्ट प्रकारची घडण असा संघटनात्मक विचार पहिल्या काही व्याख्यानांत आहे. त्यानंतर 'विवेकानंद केंद्र' या
सेवाभावी संघटनेच्या तत्त्वज्ञानाचा विचार येतो. हे तत्त्वज्ञान, 'केंद्राची' कार्यपद्धती, 'केंद्राची' उद्दिष्टं; ज्यांनी ही उद्दिष्टं साध्य करायची ते समर्पित कार्यकर्ते अर्थात 'जीवनव्रती'; नवनवीन कार्यकर्त्यांचा शोध आणि त्यांची घडण असे विषय एकनाथजींनी नंतरच्या व्याख्यानांत चर्चिलेले आहेत. या सर्व विचारांचं वैशिष्ट्य हे की, केवळ विवेकानंद केंद्राच्याच नव्हे, तर कोणत्याही संघटनेतील कार्यकर्त्याला त्यांतून मोलाचं, महत्त्वाचं आणि मूलगामी मार्गदर्शन मिळेल!सदर पुस्तक हे थेट माननीय एकनाथजी यांच्या विचारांचे संकलन असल्याने ज्यांन केंद्र मुळातून जाणून घ्यायचे आहे अशांसाठी हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र त्यांनीच हे पुस्तक वाचावे असे मात्र नाहीये. विवेकानंद केंद्र यांच्या जीवनवतींना उद्देश्यून केलेली ही भाषणे कोणत्याही संघटनेच्या स्वयंसेवकाला सुद्धा अत्यंत महत्त्वाची ठरणारी आहेत. किंबहुना तुम्ही कोणत्या संस्थेचे सदस्य असाल नसाल मात्र आपल्या भारत देशाचे उत्तम नागरिक होण्यासाठी तुम्ही हे पुस्तक वाचावेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, असेच हे पुस्तक आहे



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा