लेखाचे विषय

मंगळवार, २२ एप्रिल, २०२५

जागतिक पुस्तक दिन विशेष !


आज 23 एप्रिल अर्थात  जागतिक पुस्तक दिन, त्यानिमित्ताने सर्व पुस्तक प्रेमींना मनःपूर्वक शुभेच्छा
इंग्रजी साहित्यातील एक महान साहित्यीक शेक्सपियर  याचा स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो आज या साहित्यकाराची जयंती(Birth anniversary ) आणि पुण्यस्मरण (Death anniversary )दिवस सुध्दा
     आजकाल पुस्तकाची परीभाषा अनेकार्थाने बदललली आहे. आता आता पर्यत मराठी भाषेत न आढळणारा आँडिओ बूक हा प्रकार आता मराठीत चांगलाच रुळला आहे.अनेक अँप त्यासाठी वापरली जात आहे.येत्या काही दिवसात प्रिंट आँन डिमांड मुळे पारंपारीक पुस्तकाची दूकानांचे स्वरुप पुर्णतः बदलून जाईल, मात्र पुस्तकाचे महत्व कमी होणे अशक्य. मध्यंतरी समाजमाध्यमांवर बराच रुळलेला मात्र कायदेशीर नसणारा प्रकार म्हणजे पुस्तकाचा पिडीएफ फाईल, हे सुद्धा पुस्तकाचे एक  साधनच म्हणता येवू शकते. माझ्या माहितीत असे दोन नियतकालीके आहेत, जी मला खुद्द प्रकाशकाकडूनच व्हाँटसप मार्फतच येतात, असो. किंडल सारख्या पुस्तकांविषयीच्या गँझेटमुळे वाचताना आपल्या डोळ्याला सोइस्कर होईल, असा प्रकाश ठेवता येतो, तसेच वाचताना एखाद्या शद्बाचा अर्थ माहिती नसल्यास त्याचा अर्थ देखील समजू शकतो, तसेच कागदी पुस्तकाच्या स्वरुपात‌ साठवल्यास ज्यास खुप जागा लागेल,असी पुस्तके अत्यंत कमी जागेत राहू शकतात.तसेच त्यांचे तेल, पाणी, वाळवी, अस्या गोष्टींपासून संरक्षण होते.  पुस्तकांसाठी बुक गंगा सारख्या वेबसाइट देखील उत्तम कार्य करत आहे.
पुस्तकांविषयी  होणाऱ्या कार्यक्रमांविषयी बोलायचे झाल्यास सध्याचा न्युज 18 लोकमत (त्यावेळचे आयबीएम लोकमत) चा अवश्य उल्लेख करावाच लागेल. पुर्वी या वृत्त वाहिनीवर दर रविवारी, "वाचाल तर वाचाल" हा पुस्तकांवर आधारित कार्यक्रम.होत असे.केतकी जोशी ह्या वृत्तनिवेदिका हा कार्यक्रम सादर करत.मात्र कालांतराने तो बंद पडला.   संसद टिव्हीवर किताबनामा हा पुस्तकांविषयी सध्या होणारा एक उत्कृष्ट कार्यक्रम आहे. याखेरीज डी.डी.सह्याद्रीवर वाचू आनंदे हा पुस्तकाविषयीचा कार्यक्रम होतो
 ह्या 3कार्यक्रमांचा अपवाद वगळता मला तरी पुस्तकांवर काही कार्यक्रम झाल्याचे मला माहिती नाही.
    सर्वसाधरणपणे मार्च महिन्यात दिल्लीच्या प्रगती मैदानात विश्व पूस्तक मेळा हे पुस्तकांचे  भल्लेमोठे पुस्तक प्रदर्शन भरते.(जगभरात डंका बजावणाऱ्या मराठी  भाषिकांच्या पुस्तकांचे या मेळ्यातील स्थान काय ,हे मात्र कृपया विचारू नका )जगभरातील नामवंत प्रकाशनाची पुस्तके वाचकांना हाताळता येतात.क्राँसवल्ड सारखी मोठी पुस्तकांची अनेक दूकाने पुण्यात आढळतात.(इतर महाराष्ट्रातील स्थिती विषयी मात्र कृपया विचारू नका ) आपल्याकडील मराठी साहित्य संमेलनातसुद्धा मोठ्या प्रमाणावर पुस्तक विक्री होते. जे एका उत्तम समाजाचे लक्षण म्हणता येईल.
      सध्या आपल्या मराठीचा विचार करता अनेक नवनवीन लेखकांची पुस्तके प्रसिद्ध होत आहेत. पुर्वीपेक्षा वेगळ्या विषयांवरची ,मुळची इतर भाषेतील मात्र मराठीत अनुवादीत केलेली अनेक पुस्तके प्रसिद्ध होत आहे. काही प्रकाशक अडचणीत देखील आहेत. पुस्तकांचे लेखक आणि प्रकाशक यात अनेक विषयांवर वाद देखील आहे. मात्र ही त्रासदायक परीस्थिती नक्कीच बदलेल, अशी मला आशा आहे, आणि याच आशेवर मी तूमची रजा घेतोय, नमस्कार.

गुरुवार, १० एप्रिल, २०२५

पक्षीय राजकारणाचे मर्म उलगडवून सांगणारे साप्ताहिक, 'सरकारनामा'

एका ठिकाणी 3 व्यक्ती एकत्र आल्यावर राजकारणाला सुरवात होते. असे सुप्रसिद्ध राजशास्त्रातले  समीकरण आहे.मनुष्याचा उपजत असलेल्या स्वहित बघण्याचा स्वाभाव वैशिष्ट्यामुळे राजकरणाची निर्मिती होते.मनुष्याने कितीही टाळायचा प्रयत्न केला तरी मनुष्याची कधीच पाठ न सोडणारी गोष्ट म्हणजे राजकारण असेही म्हटले जाते‌.तर असे हे राजकारण व्यक्तीगत स्वरुपाचे देखील असू शकते.किंवा समान एका ध्येयासाठी वेगवेगळी माणसे एकत्र आल्याने वेगवेगळ्या लोकांचा एक समुह या न्यात्याने विविध पक्षांचे देखील असू शकते‌.
    आपल्या भारतासारख्या खंडप्राय लोकशाहीप्रधान, आणि विविध प्रकारची विविधता असलेल्या देशात व्यक्तीगत राजकारणापेक्षा पक्षीय राजकारण अधिक यशस्वी होवू शकते ,हे नेत्यांचा लक्षात आल्याने आज  भारतात अनेक पक्ष स्थापन झालेले आहेत.नेते त्यांचा त्यांचा पक्षाच्या मार्फत राजकारण खेळत आपले इसिप्त साध्य करण्याचा प्रयत्न करत असतात. या पक्षीय राजकारणाचा देशाच्या प्रगतीवर मोठा परीणाम होत असल्याने त्याची काही प्रमाणात माहिती देशातील जागरुक जागृत नागरिक म्हणून आपणास असणे अत्यावश्यक ठरते.आणि या कामी मदतीला येते सकाळ माध्यम समुहाकडुन प्रकाशित करण्यात येणारे 'सरकारनामा' हे साप्ताहिक.
    आर्थिक गुंतवणूक, कृषी क्षेत्र, मनोरंजन या प्रकारच्या अनेक विषयांवर दर्जेदार साप्ताहिक, दैनिक प्रकाशन काढणारा माध्यम समुह म्हणून सकाळ माध्यम समुह ओळखला जातो .या दर्जेदार माहितीपर प्रकाशनापैकी एक असलेल्या या सरकारनामा साप्ताहिकामध्ये आपणास सद्यकालिन राजकारणाची पक्षनिहाय, प्रदेशनिहाय सविस्तर माहिती मिळतेच त्या शिवाय आंतरराष्ट्रीय राजकारण आणि ज्यांना भारतातील पक्षीय राजकारणाचा सखोल अभ्यास करायचा आहे,अस्या अभ्यासू लोकांसाठी त्यांचा अभ्यासाला मदत होईल अस्या पुस्तकाची माहिती देखील या साप्ताहिकातून मिळते‌ तसेच ज्यांना  स्वातंत्र्यापासून कोणते वळण घेत सध्याचे राजकारण उभे आहे याची माहिती हवी आहे,अस्या नागरिकांसाठी ज्येष्ठ पत्रकार राजकारणी कुमार सप्तर्षी, भाजपा नेते प्रकाश जावडेकर यांच्या सारख्या धुरणींचा लेख हे सुद्धा या साप्ताहिकाचे वैशिष्ठ म्हणता येईल‌ .
      ए 3 टॅब लाइट या आकारातील 24 पानाचे दर शनिवारी प्रसिद्ध होणारे हे साप्ताहिक राजकारणाची आवड असलेल्या, राजकारणावर काही लिहण्याचा प्रयत्न करणाऱ्या तसेच राज्याचा देशाच्या वाटचालीबाबत जागरुक असलेल्या नागरिकांसाठी मोठा अनमोल खजिना आहे.  प्रकाशन सुरु झाल्यावर मध्यंतरीचा खंड पडण्याचा कालावधी सोडुन सात वर्षाहुन अधिक काळ प्रसिद्ध होणारे साप्ताहिक मी गेल्या सप्टेंबर महिन्यापासून वाचत आहे. या साप्ताहिकामुळे माझी राजकीय समज मोठ्या प्रमाणात प्रग्लभ होण्यास मदत झाली. आपण जर हे साप्ताहिक वाचायला सुरवात केल्यावर आपली देखील राजकीय जाण विकसीत होईल,यात शंका नसावी. मग वाचता य ना हे 10 रुपयांचे मात्र अनमोल असी राजकीय भाष्य असणारे साप्ताहिक, 'सरकारनामा'.


सोमवार, ३१ मार्च, २०२५

सहजसोप्या शद्बात अर्थशास्त्राचा संकल्पना सांगणारे पुस्तक,'अर्थजिज्ञासा

 
 अर्थशास्त्र, आपल्या रोजच्या जीवनात पदोपदी सामोरे जावे लागणारा विषय. रोजच्या जगण्यात आपण भाजीपाला, अन्नधान्य आणि इतर गोष्टी विकत घेतो, याचे दर महागाईशी निगडीत असतात.महागाई या घटकाचा शास्त्रीय अभ्यास अर्थशास्त्रात होतो. आपल्याकडे जरासे पैसे साठले की,ते आपण विविध ठिकाणी गुंतवतो .ही गुंतवणूक करण्याचे मार्ग अपणास अर्थशास्त्र शिकवतो.आपण एखादी गोष्ट खरेदी केल्यावर जी.एस.टी हा कर भरतो. देशातील  कररचनेचा अभ्यास अर्थशास्त्रात होतो. आपण रोजच्या आयुष्यात अनेक गोष्टी वापरतो त्यातील काही आपल्या देशात तयार झालेल्या नसतात तर इतर देशातून आपल्या देशात आयात झालेल्या असतात तर आपल्या देशात तयार झालेल्या वस्तू उत्पादक जास्त नफा मिळवण्यासाठी दुसऱ्या देशात निर्यात करतात या आयात निर्यातीचा अभ्यास अर्थशास्त्रात होतो‌. आपण शि‌क्षण झाल्यावर रोजगाराचा संधी शोधतो, देशातील रोजगाराच्या संधी निर्माण होण्यात अर्थशास्त्र महत्त्वाची भुमिका बजावते.या आणि या सारख्या असंख्य बाबींमुळे अर्शशास्त्र आपणासी जोडले गेले आहे‌. सध्याचा धावपळीच्या स्पर्धेच्या जगात तर ही जोडणी दिवसोंदिवस अधिकच घट्ट होताना आपल्याला दिसतेय.
आजमितीस हा मजकूर लिहताना अर्थशास्त्र केवळ पिवळसर  कागदावर छापलेल्या वर्तमानपत्र किवा टिव्हीवर तळाच्या बाजुला वेगाने जाणाऱ्या दोन पट्यांवर काही नावे सरळ असणारा हिरवा त्रिकोण आणि उलटा लाल त्रिकोण चा संदर्भात दाखवणाऱ्या शेअर मार्केटविषयीच्या वृत्तवाहिन्यांपर्यत मर्यादित नाही.हे आपण वर बघीतलेच आहे‌.तर मित्रांनो या प्रकारे आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालेल्या या अर्थशास्त्रात अनेक संकल्पना आज सर्वसामान्य व्यक्तीसुद्धा सहजतेने वापरतो मात्र या संकल्पना त्यास मुळातून समजल्या असतीलचअसे नाही अनेकादा अपुऱ्या ज्ञानातूनच त्या वापरात असल्याचे आपणास दिसते‌ या अपुऱ्या ज्ञानातूनच या संकल्पना वापरल्याने अनेकदा गोंधळ होण्याची शक्यता नाकरता येत नाही 
        मग या गोंधळावर उपाय तर काय,? तर या संकल्पना व्यवस्थित समजावून घेणे‌, आणि त्यासाठी आपल्याला मदत करतो. कॉण्टिनल प्रकाशनातर्फे प्रकाशित आणि. नाशिकचे सुविख्यात चार्टड अकाउंट, वृत्तपत्रात सातत्याने अर्थशास्त्र विषयक लेखन करणारे,  नाशिकच्या बी‌.वाय.के महाविद्यालयात अध्यापनाचे कर्य केलेल्या डॉ.विनायक गोविलकर सर लिखित 
अर्थजिज्ञासा हा ग्रंथ.जो नाशिकमधील महत्त्वाची सार्वजनिक सांस्कृतिक संस्था सावाना अर्थात सार्वजनिक वाचनालय नाशिक च्या मदतीने नुकतेच वाचले.
    755 पानांच्या या ग्रंथात सहजसोप्या सुगम मराठीत अर्थशास्त्राविषयक 155 संकल्पना समाजावून सांगितल्या आहेत.प्रत्येक संकल्पना 3ते 5पानात उलगडून सांगण्यात आली आहे.अन्य मराठी भाषेतील माहितीविषयक पुस्तकात अनेकदा आढळते ती गोष्ट अर्थात व्यवहारात रूढ नसलेल्या संस्कृतच्या प्रभावाखालील मराठी भाषेतील परीभाषिक  संज्ञेचा वापर या पुस्तकात आवश्यक तेव्हढाच केला आहे.अनेक ठिकाणी जर इंग्रजी भाषेतील शद्ब व्यवहारात रूढ असेल तर तोच वापरला आहे त्याचे विनाकारण मराठीकरण करत, कठीणपणा टाळला आहे‌. त्यामुळे वाचलेली माहिती चटकन समजते‌.एखाद्या संकल्पनेची माहिती ग्रथात नक्की कोठे आहे हे सहजतेने समजावे यासाठी अल्फाबेटीकली मराठी आणि इंग्रजी भाषेतील अनुक्रमणिका पुस्तकाच्या सुरवातीलाच देण्यात आल्याने, पुस्तक खऱ्या अर्थाने संदर्भ ग्रंथ म्हणून वापरता येतो.
लेखाच्या सुरवातीला सांगितले तसे व्यवहारत वावरताना आपला अर्थशास्त्रविषयक गोंधळ होवू नये, तसेच आपल्याकडून  दुसऱ्याशी बोलताना देखील अचूक बोलणे व्हावे, ज्यामुळे दुसऱ्याचा देखील गोंधळ होणार नाही .या साठी अर्थशास्त्रीय संकल्पना स्पष्ट करणारा हा ग्रंथ आपण एकदा तरी वाचायलाच हवा.

सोमवार, १७ मार्च, २०२५

बदलत्या तंत्रज्ञानाची सखोल सविस्तर माहिती देणारे पुस्तक 'इंडस्टी 4.0

        'सध्याचे जग तंत्रज्ञानाचे आहे. आता जगात तूमच्या शारिरीक शक्तीपेक्षा अधिक महत्व तंत्रज्ञानाचे आहे हे आपण रोजच्या जगण्यात पदोपदी अनुभवतोच, या सातत्याने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या जगात आपण मागे पडू नये यासाठी आपण सर्वच जण आपल्यापरीने प्रयत्नशील देखील असतो .मी देखील या प्रयत्नात असताना मला एक खजिना गवसला तो म्हणजे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वाची कंपनी असलेल्या आय.बी एम.सारख्या प्रख्यात कंपनीत काही काळ कार्यरत असणारे डॉ .भुषण केळकर सरांनी लिहलेले इंडस्ट्री 4.0 हे पुस्तक.

      केळकर सरांच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवाने पुस्तकाला परीपुर्ण केले आहेच हे सांगायला नकोच. सरांच्या अनेक विद्यार्थ्यांनी सरांच्या मार्गदर्शनाखाली पी.एच.डी.केल्यामुळे डॉ.भूषण केळकर सरांचे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील श्रेष्ठत्व वेगळे सांगायलाच नको. डॉ.भूषण केळकर सरांनी लोकमतच्या ऑक्सिजन या तरुणाईसाठीच्या पुरवण्यांसाठी लिहलेल्या लेखांचे पुस्तकस्वरुपात पुनर्प्रकाशन म्हणजे हे पुस्तक .डॉ.भुषण केळकर सरांच्या त्या लेखमालिकेला त्यावेळी संपुर्ण महाराष्ट्रातील लेखमालिकेला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे  आपणास आठवत असेलच.
त्यावेळी प्रसिद्ध झालेल्या 53लेखांचे हे 144 पानाचे पुस्तक आपणास आर्टिफिशीयल इंटेलिजियन्स, ब्लॉक चेन, क्लाउड कम्प्युटिंग, इंडस्ट्री 4.0 भविष्यात येवू घातलेली इंडस्ट्री 5.0 या सारख्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील वेगवेगळ्या घटकांची विविध अंगाने माहिती देते.माहिती देताना या बदलला सामोरे जाण्यासाठी  स्वत:मध्ये असण्याची गरज असलेली कौशल्ये आपणास  कोणत्या प्रकारे आत्मसात करता येतील, हे देखील लेखकाने सांगितल्याने हे पुस्तक खऱ्या अर्थाने  जीवनावश्यक झाले आहे.पुस्तक पुर्वी वृत्तपत्रात लेख मालिके स्वरूपात प्रसिद्ध झाले असल्याने असेल कदाचित पुस्तकातील प्रत्येक प्रकरण सुटसुटीत चटकन समजणारे, आणि सहजसोप्या भाषेत लिहलेले जास्त मोठे नसणारे झाले आहे‌.ज्यामुळे पुस्तकाचे आकलन सहजतेने होते 
येणारा काळ हा फक्त आणि तंत्रज्ञानाचा असल्याने त्यात पारंगत होण्यासाठी हे पुस्तक वाचणे आवश्यक आहे


रविवार, ९ मार्च, २०२५

निखळ आनंद देणारे पुस्तक,' माझा बायकोचा नवरा'

   
विनोदाचे मानवी जिवनातील‌ स्थान अत्यंत महत्तवाचे आहे. जिवंतपणी जाळते,तीला चिंता म्हणतात. मनुष्याने चिंतेपासून दुर राहण्यासाठी आनंदी राहिले पाहिजे.संकटे येतात आणि जातात.मानवाने आनंदी राहिले तर  या संकाटाचा तो सहजतेने तोंड देवू शकतो. या प्रकराची विधाने आपण अनेकदा वाचतो ,ऐकतो. आनंदी राहण्यासाठी अनेक उपाय योजता येतात.त्यात अनेक व्यक्तींकडून वापरण्यात आलेला उपाय म्हणजे, विनोदी साहित्य वाचणे.आपल्या मराठीला मोठ्या प्रमाणात विनोदी साहित्याचा वारसा आहे.पु.ल.देशपांडे, व.पु.काळे,
चि.वि.जोशी अस्या अनेक लेखकांनी विनोदाला एका उत्तम उंचीवर नेवुन ठेवला आहे.याच परंपरेतील एक पुस्तक म्हणजे नाशिकचे ज्येष्ठ साहित्यीक नरेश महाजन सरांनी लिहलेले आणि शद्बमल्हार प्रकाशनातर्फे प्रकाशित पुस्तक माझा बायकोचा नवरा'हे पुस्तक. मी नाशिकमधील सर्वात जूने वाचनालय 'सार्वजनिक वाचनालय नाशिक' अर्थात सावानाच्या मदतीने नुकतेच वाचले.
        160 पानी या पुस्तकात 13 विनोदी कथा समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत.विनोद म्हटला की टिव्हीवरील कार्यक्रमांमुळे  सध्याचा काळात आपल्यासमोर सहजतेने येणारे चित्र अर्थात भाषेची पातळी घसरणे, पुरषांनी महिला वर्गाचे कपडे घालणे याचा लवलेषशी या कथांमध्ये आढळत नाही.तर असे न करताही सहजतेने रोजच्या आयुष्यात घडणारे प्रसंगही कोणत्या सहजतेने विनोद निर्मितीचा दृष्टीने खुलवता येतात,याचे दर्शन आपणाला नरेश महाजन सरांच्या या कथांमधून होते.
सध्या नाशिक परीसरात अनेकदा घडणाऱ्या वन्यप्राण्याचा मानवी वस्तीतील प्रवेशावर पहिली कथा आधारीत आहे.यामुळे घडणाऱ्या गमती जमंती,आणि मानवी स्वाभाव हे कथेचे बीज आहे.त्यानंतरच्या कथांचा विचार करता, दहावी परिक्षेचे पर्यवेक्षण, आदेश बांडेकर यांच्या होम मिनीस्टर या कार्यक्रमात प्रवेश मिळण्यासाठी महिलांची झुंबड, मृत पत्नीचे भुत दिसणे,  कथा, लेखकाच्या एका छोट्यासा गावातील मुलाखत,तंटामुक्ती अभियानात यश मिळावे या प्रयत्नात गावकरीच कसा अडथळा होतात, राजकीय पक्षांच्या साठेमारीत एक व्यक्ती कोणत्या पद्धतीने स्वत:चा फायदा करुन घेते, एका प्रसिद्ध व्यक्तीची हत्या कोणी केली,याचा पोलीसी तपास आदि अनेक प्रसंगावर आधारीत कथा या कथासंग्रहात आहे.ज्या वाचकाला पुस्तक वाचताना खिळवून ठेवतात.
पुस्तकातील प्रत्येक कथेतील प्रसंग लेखक नरेश महाजन सरांनी मोठ्या सहजतेने कथेत गुंफले आहेत.ज्यामुळे कथा
मोठ्या प्रमाणात वाचणीय झाल्या आहेत..कोणतीही कथा वाचताना कंटाळवणी होत,कथा अर्ध्यावर सोडून पुढची कथा वाचण्याची इच्छाच होत नाही.
पुस्तक वाचल्यावर कोणत्याही व्यक्तीचा तणाव सहजतेने पळून जाईल,यात शंका नसावी, तणावरहित आयुष्य जगल्यास आपलै आयुष्य वाढते.तर मग जास्त वर्ष जगण्यासाठी वाचणार ना हे पुस्तक!

मंगळवार, २५ फेब्रुवारी, २०२५

भारताच्या वैभवशाली वारश्याची ओळख करुन देणारे पुस्तक, 'सिंधू -हरवलेली संस्कृती'

आपल्या भारताला आदिम काळापासून मोठा वैभवशाली वारसा मिळालेला आहे.  आहे.मानवाला लेखन कला अवगत नव्हती त्या म्हणजेच इतिहासकारांचा मते pre history काळ असो किंवा मानवाला लेखनकला अवगत होती मात्र अद्याप तीचा उलगडा मानवाला झालेला नाही अस्या कालखंडात अर्थात proto hostory कालखंड असो किंवा इतिहासकारांच्या मते ज्याला history peroid  (ज्याचे accient ,mideverial, modern असे तीन भाग पडतात) म्हणतात त्या कालखंडातील असो या सर्वच कालखंडात भारताला वैभवशाली वारसा  मिळाल्याचे इतिहासाच्या शास्त्रीय पद्धतीने संशोधनातून  वारंवार सिद्ध झाले आहे.याच विस्तीर्ण कालखंडातील एक महत्तवाचा टप्पा म्हणजे सिंधु सरस्वती संस्कृतीचा कालखंड होय. आपल्या दुर्दैवाने भारताच्या या प्राचीन वारस्याची माहिती  देणाऱ्या पुस्तकाची आपल्याकडे मोठ्या प्रमाणात वानवा आहे.मात्र काळकुट्ट अंधारात मिणमिणती पणती मोठ्या प्रमाणात उजेड निर्माण करते त्याचप्रमाणे हा अभाव दुर करण्याचे काम सनय प्रकाशनतर्फे प्रकाशित अनुवादीत पुस्तक 'सिंधू हरवलेली संस्कृती' हे पुस्तक काही प्रमाणत करते .
मुळातील लंडन येथील Reaktion Publishication चे The indus: Lost civilization नावाच्या 2015 साली प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाचा हा अनुवाद आहे.नाशिकमधील सर्वात जूने वाचानालय असलेल्या सावाना अर्थात सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्या मदतीतून मी हे पुस्तक नुकतेच वाचले .
    या पुस्तकात 240 पानांमधून 12प्रकरणांमधून या संस्कृतीच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला आहे.ज्यात या संस्कृतीच्या अधिकृत शोध लागण्याचे मानण्यात येते त्या 1923 चा रेल्वेमार्ग तयार करण्याचा घटनेच्या आधीपासून या ठिकाणाबाबतची विविध तज्ञ्ज व्यक्तींची मते काय होती.मोहोंनजारो आणि या संस्कृतीचे अवशेष सापडलेल्या अन्य ठिकाणी  आतपर्यतच्या  उत्खनातून काय सापडले आहे.? या संस्कृतीचे समाज जीवन, व्यापारी जीवन  कसे होते? या संस्कृतीच्या धार्मिक कल्पना काय असू शकतात.?सिंधु सरस्वती संस्कृतीचा बाहेरील जगाशी कोणत्या प्रकारे आणि कोणत्या माध्यमातून संपर्क होता, ही संस्कृती कोणत्या कारणाने नष्ट झाली? या संस्कृतीचाविकास कोणत्या कालखंडात आणि कस्या प्रकारे झाला? तीच्या लिपीच्या कितपत उलगडा झाला आहे,?उलगडा करण्यातील अडचणी आणि सुगम बाजू कोणत्या ? या सांस्कृतिक विविध बाबींचा हिंदू धर्मातील बाबींवर कोणत्या प्रकारे प्रभाव आहे.?सिंधू संस्कृतीने आपल्यासाठी कोणता वारसा ठेवला आहे याचा प्रामुख्याने समावेश करता येईल.
       मी वाचले तो मुळच्या इंग्रजी पुस्तकाचा शीतल भांगरे यांनी केलेला  मराठीतील अनुवाद होता.मी मराठीत अनुवादीत झालेली काही पुस्तके वाचली आहेत,त्या अनुभवावर सांगतोय,या पुस्तकाची भाषा खुपशी बोजड, कृत्रिम वाटते‌‌. पुस्तक माहितीपुर्ण असल्याने देखील भाषा अशी असू शकते मात्र या भाषेमुळे पुस्तक वाचताना काहीसे कंटाळवाणे होते.वाचताना वाचकाला खिळवून ठेवण्यात पुस्तक काहीसे कमी पडते असे माझे निरीक्षण आहे‌.मात्र

पुस्तकात ठिक ठिकाणी गरजेनुसार सिंधू सरस्वती संस्कृतीतील अवशेषांची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत.त्यामुळे विषय समजायला मदत होते.अन्य अनुवादीत पुस्तकांप्रमाणे अनुवादकाचे मनोगत ही गोष्ट या पुस्तकात आढळत नाही. पुस्तकाच्या सुरवातील देण्यात आलेल्या कालानुक्रमामुळे सिंधू सरस्वती संस्कृतीचा विकास कधी झाला ,तिचा शोध कधी लागला ,या दरम्यान त्या प्रदेशात मोठ्या कोणत्या घटना घडल्या हे समजते. 
    सिंधू सरस्वती संस्कृतीमध्ये सांडपाण्याची भुमिगत व्यवस्था उत्तम होती, तसेच मोठे रुंद रस्ते असल्याचे  पुरावे सापडले आहेत.दुर्देवाने आज याच प्रदेशात मोडणाऱ्या आपल्या भारतात याची उणीव आहे.या उणीवांवर मात करायची आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लाल किल्यावरुन जाहिरपणे सांगावे लागल्याचे आपणास आठवत असेलचं, जे आपणासाठी भुषणावह नाहीये‌.तरी हा कलंक दुर होण्यासाठी करावयाच्या प्रयत्नामध्ये आपल्याला या प्राचीन वारस्याची मोठी मदत होवू शकते मात्र त्यासाठी आपल्याला त्याची माहिती असणे आवश्यक आहे.आणि त्यासाठी आपण हे पुस्तक वाचायलाच हवे.

शुक्रवार, ७ फेब्रुवारी, २०२५

नाशिकचा इतिहास , समृध्द वारसा सांगणारे पुस्तक,'नासिक डायरी'

         नाशिक, रंगपंचमीच्या दिवशी रहाडामध्ये उतरुन रंग खेळण्याची अनोखी प्रथा असलेले शहर, कुरमुऱ्यांचा तिखट चिवडा, मिसळ आणि वाइनसाठी प्रसिद्ध असलेले शहर,आदिवासी ,खानदेशी ,आणि पश्चिम महाराष्ट्राच्या संगमावर वसलेले शहर म्हणजे नाशिक., दक्षीण काशी असी ओळख असलेले तांब्याच्या वैशिष्टपुर्ण भांड्यांसाठी प्रसिद्ध असलेले शहर म्हणजे नाशिक.या  नाशिकला फार पुर्वीपासूनचा इतिहास आहे, महाराष्ट्राच्या आणि देशाच्या आतापर्यतच्या वाटचालीत,इतिहासात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या अनेकांची जन्मभुमी कर्मभुमी नाशिक शहर आहे.या नाशिक शहरालगत असलेल्या लेण्यांना मोठा वैभवशाली इतिहास आहे. या सर्व खजिन्याची माहिती करुन घेयची असल्यास महाराष्ट्र टाइम्सच्या नाशिक आवृत्तीत  कार्यरत असलेल्या रमेश पडवळ सरांनी लिहलेल्या 'नाशिक डायरी या पुस्तकाखेरीज दुसरा उत्तम पर्याय तो कोणता? नाशिकमधील सर्वात जूने वाचनालय असलेल्या सावाना अर्थात सार्वजनिक वाचनालय नाशिक च्या संग्राहालयात असलेले हे पुस्तक मी नुकतेच वाचले.रमेश पडवळ सरांनी नाशिकवर हे पुस्तक धरुन ५पुस्तके लिहली आहेत.त्यापैकी मी वाचलेले हे दुसरे पुस्तक. मी या आधी त्यांचे तपोभूमी नाशिक हे पुस्तक वाचले होते.ते या पुस्तकाप्रमाणेच माहितीपुर्ण होते. त्या पुस्तकाविषयी ज्यांना जाणून घेयचे असेल त्यांनी या लेखाच्या शेवटी असलेल्या लिंकवर क्लिक करावे.
     272 पानांच्या या पुस्तकात लेखकाने 24प्रकरणाद्वारे प्राचीन युगातील नाशिकच्या परीसरात राज्य करणारे सातवाहन राज घराणे, नाशिकमधील कर्तुत्वान महिला, नाशिकमधील शिक्षणक्षेत्र, नाशिकमध्ये झालेला ख्रिस्ती धर्माचा प्रसार,रामकुंड परीसरात असलेल्या समाधी, नाशिकमधील विविध शाहीर, स्वातंत्र्यवीर सावरकर, रामदास स्वामी यांनी टाकळी परीसरात केलेले केलेले कार्य, नाशिक शहरात असलेल्या पांडवलेणी आणि चामरलेणी, नाशिक परीसरात जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या पेशवेकालीन सरदार  या सारख्या घटकांची माहिती दिलेली आहे. तसेच नाशिकचा विविध ग्रंथात आलेला उल्लेख,नाशिक परीसरातील महानुभाव पंथाची धार्मिक स्थळे, तसेच ब्रिटीश काळातील नाशिकची छायाचित्रे आणि चित्र काढणारे छायाचित्रकार आणि चित्रकार नाशिक परीसरातील मारुतीची मंदिरे, नाशिक शहरातील जूनी पाणी पुरवठ्याची व्यवस्था कशी होती या विषयीची माहिती आपणास या पुस्तकातून समजते.
              पडवळ सरांनी कोव्हिड 19 च्या साथरोगात लागू करण्यात आलेल्या पहिल्या लॉकडाऊनच्या काळात नाशिककरांचे धैर्य अबाधित राहावे यासाठी फेसबुकवर लिहलेल्या लेखांचा संग्रह म्हणजे सदर पुस्तक होय.पुस्तकाची भाषा सहजसोपी चटकन समजणारी आहे.पुस्तक हे नाशिकविषयी माहिती देणारे असून देखील लिहतांना वापरलेल्या पुस्तक अत्यंत वाचणीय झाले आहे,कंटाळवाणे वाटत नाही.विषय कितीही कठीण असला तरी तो सहजसोप्या दुसऱ्याला सहजतेने समजेल या पद्धतीने मांडू शकतो तो उत्कृष्ट शि‌क्षक असतो असे म्हणतात या कसोटीचा विचार करता हे पुस्तक या कसोटीवर 100टक्के खरे ठरते.पुस्तक माहिती देणारे असले तरी पुस्तकाची गोष्टीवेल्हाळ स्वरूपाची भाषा हे या पुस्तकाचे प्रमुख वैशिष्ठ म्हणता येईल.
         आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक शहराला काहीना काही इतिहास आहे.जो शालेय अभ्यासक्रमात शिकवला जातोच असं नाही.मात्र आपण ज्या प्रदेशात राहतो त्या प्रदेशाच्या सध्याचा सामाजिक ,राजकीय जीवनावर या इतिहासाचा मोठा प्रभाव असतो.आपणाला सध्या भेडसावणाऱ्या अनेक समस्यांचे मुळ या इतिहासात दडलेले असते.त्यामुळे आपणास तो माहिती असणे आवश्यक ठरते‌.याला नासिक डायरी सारखी पुस्तके  मोलाची मदत करतात..नाशिक सारख्या मोठ्या शहराछा महाराष्ट्रावर मोठा प्रभाव असतो त्यामुळे नाशिकचा इतिहास नाशिककरांखेरीज अन्य लोकांनी देखील वाचणे अत्यावश्यक आहे ज्यात हे पुस्तक मदत करते, मग वाचणार ना हे पुस्तक 

मी या आधी रमेश पडवळ सरांच्या वाचलेल्या पुस्तकाची अर्थात तपोभूमी नाशिक, या पुस्तकाची मी करुन दिलेली ही ओळख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. https://ajinkyatartebookreview.blogspot.com/2024/02/blog-post_55.html

साप्ताहिक ‘विवेक’ : विचारजागृती आणि संस्कृती संवर्धनाचे प्रभावी माध्यम

आपल्या भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यावर या नव्या देशाची वाटचाल वेगाने प्रगतीच्या वाटेवर व्हावी.गुलामीच्या ब्रिटिश राजवटीत  थांबलेला ...